शेतकरी संपाला "नाम'चा पाठिंबा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 जून 2017

मुंबई - दुष्काळी भागांत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी काम करणाऱ्या "नाम फाउंडेशन'ने राज्यातील शेतकरी संपाला बुधवारी पाठिंबा दर्शवला. राज्यातील अन्नदात्यांना जगण्यासाठी संप करावा लागतो, ही दुर्दैवी बाब आहे. गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायला हवी, त्याचवेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी राजकीय नेत्यांनी पावले उचलायला हवीत, असे मत फाउंडेशनचे संस्थापक, अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. शेती हा मुख्य व्यवसाय नसलेल्यांनी स्वतःहून सरकारी मदत नाकारावी. कारण त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय वेगळा असतो, असे आवाहनही त्यांनी केले.