लोकमान्य टिळकांच्या शाळेला आर्थिक मदत

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई - स्वातंत्र्यपूर्व काळातील निवडक 100 शाळांना विशेष आर्थिक मदत देण्याचा कॉंग्रेस आघाडी सरकारचा निर्णय विद्यमान सरकारने रद्द केला असला, तरी ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शाळांना ही मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलची ही मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विखे पाटील यांनी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून हा विषय मंगळवारी विधानसभेत उपस्थित केला. ते म्हणाले, की स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यातील निवडक 100 शाळांना ज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारावर प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा निर्णय यापूर्वीच्या कॉंग्रेस आघाडी सरकारने घेतला होता; परंतु यामुळे आर्थिक परिस्थितीवर परिणाम होईल, अशी सबब सांगून विद्यमान सरकारने 5 जुलै रोजी या शाळांना निधी देण्याचा निर्णय रद्द केला.

या शाळांमध्ये अनेक थोर व्यक्तींनी शिक्षण घेतले होते. कविवर्य कुसुमाग्रज, कर्मवीर भाऊसाहेब हिरे आदींनी शिक्षण घेतलेले नाशिकचे रुंगटा हायस्कूल, लोकमान्य टिळक व आगरकर यांनी स्थापन केलेली पुण्याची न्यू इंग्लिश स्कूल आदी शाळांचा यामध्ये समावेश होता. या शाळांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वसामान्य जनतेला शिक्षणाची दारे खुली करून दिली. स्वातंत्र्य लढ्याबाबत जनजागृती केली. त्यामुळे या शाळांना प्रस्तावीत असलेली दहा लाख रुपयांची विशेष आर्थिक मदत नाकारणे चुकीचे आहे. आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असल्याने त्यांना आदरांजली म्हणून पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलसह इतर 100 शाळांची मदत रोखण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. औचित्याच्या मुद्याद्वारे उपस्थित केलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शाळांना मदत दिली जाईल, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी या वेळी दिले.