थॅलेसेमिया रुग्णांसाठी पाच जिल्ह्यांत प्रकल्प

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई - थॅलेसेमिया रुग्णांसाठी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सातारा आणि अमरावती या जिल्ह्यांत केंद्र सरकारचा प्रकल्प पाच वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली.

मुंबई - थॅलेसेमिया रुग्णांसाठी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सातारा आणि अमरावती या जिल्ह्यांत केंद्र सरकारचा प्रकल्प पाच वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यात थॅलेसेमिया रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, अशी माहिती विधान परिषदेत लक्षवेधी चर्चेदरम्यान सावंत यांनी दिली.

थॅलेसेमियाग्रस्तांना पुरेशी औषधे मिळावीत, यासाठी थॅलेसेमियाचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि दोन सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांची देखरेख समिती नेमण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. थॅलेसेमिया रुग्णांना पुरेशी औषधे मिळावीत आणि या आजारासाठी प्रतिबंधक उपाययोजना राबवाव्यात, अशी लक्षवेधी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जगन्नाथ शिंदे यांनी मांडली होती. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सावंत यांनी याबाबतची आकडेवारी नमूद करत 2012 मध्ये राज्यात थॅलेसेमिया रुग्णांची संख्या तीन हजार 640 होती, अशी माहिती दिली. या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन 2017 मध्ये ती सहा हजार 71 वर गेली, असे त्यांनी सांगितले.

या प्रकल्पाद्वारे आकडेवारी हातात आल्यानंतर प्रकल्प संपूर्ण राज्यात राबवला जाईल, असे त्यांनी सांगितले. थॅलेसेमिया रुग्णांना औषधपुरवठा कमी पडू देणार नाही, असे सांगत याचा भार स्थानिक स्वराज्य संस्थांनीही उचलावा, असे आवाहन त्यांनी केले. मोठ्या महापालिकांना यासाठी सहकार्य करण्याची सक्ती केली जाईल. या संदर्भात आणखी संशोधन करण्याची शिफारसही वैद्यकीय विभागाला केली जाईल, अशी माहिती सावंत यांनी दिली.