गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

मुंबई - "कहॉं गए, कहॉं गए...अच्छे दिन, कहॉं गए?' "देश की जनता रो रही है, मोदी सरकार सो रही है,' "हर हर जुमला, घर घर जुमला', अशा घोषणा देत स्वयंपाकाच्या गॅस दरवाढीच्या (एलपीजी) विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीने आक्रमक आंदोलन केले.

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या विरोधात या आंदोलनकर्त्या महिलांनी सीएसएमटी परिसर दणाणून सोडला.

18 महिन्यांमध्ये जवळजवळ 19 वेळा गॅसचे दर वाढले आहेत. हा दर राज्यातील ग्रामीण महिलांसह सर्वसामान्यांचे गृहबजेट बिघडवून टाकणारा असल्यानेच जनतेचा संताप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला व्यक्त करत असल्याचे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.

राज्यभर "उज्ज्वला गॅस योजने'चे मोठे बॅनर मोदी सरकारने लावले आहेत. त्या योजनेवर "महिलांचा सन्मान' असे लिहिले आहे; परंतु कुठे आहे महिलांचा सन्मान? असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी बोलताना केला. आज चुलीवर स्वयंपाक करणे ही चैन नाही, तर महिलांची मजबुरी आहे आणि यासाठीच सरकारने उज्ज्वला गॅस योजना आणली; परंतु आज या योजनेतील महिलांनाही त्याच दरामध्ये सिलिंडर मिळत आहे, त्यामुळे ही योजना लोकांच्या डोळ्यांत धूळ फेक करणारी आहे, अशी टीका वाघ यांनी या वेळी केली.

या आंदोलनानंतर पोलिसांनी मोर्चेकरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले.