राज्यात मुलींचा जन्मदर घटला - डॉ. सावंत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मुंबई - राज्यात मुलींचा जन्मदर घटल्याची धक्कादायक कबुली सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली. शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.

मुंबई - राज्यात मुलींचा जन्मदर घटल्याची धक्कादायक कबुली सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली. शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.

महाराष्ट्र गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानानंतर कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखरेख समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणाही डॉ. सावंत यांनी केली. लिंगनिदानविरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली होती. यावर, मुलींच्या घटत्या जन्मदरामागे काही सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा प्रभाव असल्याचे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. आजवर रत्नागिरीत मुलींचे प्रमाण जास्त होते, त्यात आता घट होत असल्याचे दिसून येत आहे, असे ते म्हणाले.

राज्यात 1991च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तराचे प्रमाण एक हजार मुलांमागे 946 मुली असे होते. 2001 च्या जनगणनेनुसार ते 913 म्हणजेच 33 ने कमी झाले. 2012 च्या जनगणनेत हेच प्रमाण 894 म्हणजेच 19 ने कमी झाले. यापूर्वी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुलींचे प्रमाण समाधानकारक होते; मात्र आता त्यात घट झाल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली आणि बीडमध्ये मुलींचे प्रमाण वाढत असल्याचे ते म्हणाले.

गर्भपातप्रकरणी न्यायालयातील प्रलंबित खटल्यांमध्ये जलदगतीने कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्र गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानानंतर कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. या कायद्यांतर्गत 572 खटले दाखल करण्यात आले. यातील 298 पैकी 102 डॉक्‍टरांना शिक्षा सुनावण्यात आली. त्यात 75 डॉक्‍टरांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेचा अंतर्भाव असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. या चर्चेत जोगेंद्र कवाडे, हेमंत टकले आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

मुलींचे घटते प्रमाण
- 1991 ची जनगणना - 946
- 2001 ची जनगणना - 913
- 2012 ची जनगणना - 894
(दर हजारी मुलांमागे)