महेता, मोपलवारांमुळे सरकारची कोंडी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

परिषदेत सत्ताधाऱ्यांचाच सभात्याग; विधानसभा पाच वेळा तहकूब

परिषदेत सत्ताधाऱ्यांचाच सभात्याग; विधानसभा पाच वेळा तहकूब
मुंबई - म्हाडाने खासगी विकसकाकडून परत घेतलेला भूखंड गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी त्याच विकासकाला नियमबाह्यपणे दिल्याचे प्रकरण आणि मंत्रालयातील कामांसाठी काही कोटी स्वीकारत असल्याच्या अधिकारी राधेश्‍याम मोपलवार यांच्या कथित संभाषणाची ध्वनिफीत यामुळे विधिमंडळात आज सत्ताधाऱ्यांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवण्यात आला. दोन्ही आरोपांमुळे सत्ताधारी कोंडीत सापडल्याने त्यांनी विधान परिषदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.

विधानसभेचे कामकाज दिवसभरात पाच वेळा तहकूब करावे लागले.
प्रकाश महेता यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली असतानाच महेता यांच्या कार्यालयातून मंत्रिमंडळातील सहकारी हे कुभांड रचत असल्याचे पत्रक काढण्यात आले. हे पत्रक खरे आहे काय, असा प्रश्‍न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केला.

मात्र, मी किंवा माझ्या कार्यालयाने, असे कोणतेही पत्रक काढले नसल्याची माहिती महेता यांनी पत्रकारांना दिली. या प्रकरणाची आपण सायबर क्राईमकडे तक्रार केली आहे, या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री फडवणीस यांना दिली असल्याचेही महेता यांनी स्पष्ट केले.

पंतनगर घाटकोपर येथील सीटीएम क्रमांक 194 हा 18 हजार 902 चौरस मीटरसचा भूखंड निर्मल होल्डिंगला दिल्याचे हे प्रकरण आहे. त्याबद्दल कोणताही प्रतिसाद न दिल्याने हे प्रकरण बाहेर आल्याचे बोलले जाते. त्यातच हा भूखंड विकसित न झाल्याने म्हाडाने परत घेतला आणि तो महेता यांनी पुन्हा त्यांनाच बहाल केल्याचे हे प्रकरण आज हाती घेत विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवल्याचे एक प्रकरण ताजे आहे. त्यातच सहकाऱ्यांवर केलेल्या आरोपांमुळे पक्षातील वाद त्यामागे आहे, अशी चर्चा सुरू होती. मात्र, महेता यांनी, मला मेल करता येत नाही; माझा सहकाऱ्यांवर विश्‍वास आहे, असे सांगितले.

समृद्धी महामार्गाचा प्रकल्प राबवणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्‍याम मोपलवार यांच्या कथित संभाषणात ते मंत्रालयातील कामांसाठी काही कोटी रुपये स्वीकारत असल्याची माहिती आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी असा भ्रष्ट अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नप्रकल्पाचा प्रमुख कसा, असा प्रश्‍न उपस्थित केला. पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार यांनीही या प्रकरणी जोरदार आरोप केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे कथित संभाषण आमच्या काळातले नाही, अशी भूमिका घेतली. मात्र, विरोधकांनी हा विषय लावून धरल्याने अखेर आरोप होतात म्हणून चौकशी करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र, समाधान न झालेल्या विरोधकांनी या विषयावर दिवसभर आक्रमक भूमिका कायम ठेवली. तेलगी मुद्रांक गैरव्यवहारात मोपलवार यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्यांनी अंतरिम जामीन घेतला आहे. अशा अधिकाऱ्याला का जवळ केले जाते, असा हा प्रश्‍न होता.

आज ऐकवण्यात आलेल्या मोपलवार यांच्या संभाषणात ते सतीश मांगले नावाच्या एका व्यक्तीबरोबर ते बोलत आहेत. "ते जे वार्षिक ठरले आहे. ते आपल्यालाच बघावे लागेल. कोटी देऊन टाकू', अशा अनेक विधानांचा उल्लेख आहे. अन्य एका सीडीत पनवेल येथील भूखंडाचा उल्लेख आहे. सुमारे 35 संभाषणांचे संकलन फिरत असून, 50 कोटी व 10 कोटी, असा उल्लेख करणारा सनदी अधिकारी नोकरीत कसा? त्यांना निलंबित करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

समृद्धी अधिकारी वादग्रस्त
समृद्धी महामार्गाचे काम हाताळणारे सर्व प्रमुख अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात असल्याचे दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात नमूद केले. हे अधिकारी निर्दोष सिद्ध होत नाहीत तोवर त्यांना जबाबदारी का देता, पुरंदकर यांचे कोलकात्यातील बंद पडलेल्या कंपनीत समभाग आहेत. अनिल गायकवाड हे महाराष्ट्र सदन घोटाळ्याशी संबंधित असल्याचा आरोप आहे. रेवती गायकर या अधिकारी महिलेची भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आज दिवसभर या दोन्ही आरोपांच्या वेळी एकनाथ खडसे हजर होते. त्यांचा वारंवार उल्लेख करीत प्रकाश महेतांना वेगळा न्याय का? त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही, असा प्रश्‍न केला जात होता.

महेतांचा निर्णय श्रेष्ठी घेणार?
गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांचा राजीनामा अटळ आहे काय, अशी चर्चा आज सुरू होती. मात्र, महेता यांचे पक्षातील स्थान, तसेच त्यांच्या पाठीशी असलेले बळ लक्षात घेता, दिल्लीतील श्रेष्ठी त्यांच्यासंबंधी काय ते ठरवतील, असे सांगितले जाते.

महाराष्ट्र

पुणे - कोकणसह मध्य महाराष्ट्रात सोमवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचेही हवामान विभागाच्या...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

नाशिक  - निरक्षरतेचा गैरफायदा घेत आंबेगावच्या (ता. पेठ) पोस्टमास्टरने चुकीच्या नोंदी करत नागरिकांच्या पैशांवर डल्ला...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबई - भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी केल्यानंतर आज शिवसेनेचे चार मंत्री मंत्रालयात उपस्थित होते, तर आमदारही मंत्रालयात...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017