डॉक्‍टर नसल्यास 'डायल' 104

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

मुंबई - प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यास रुग्णाच्या नातेवाइकांनी आरोग्य सल्ला संपर्क केंद्राच्या 104 क्रमांकावर तक्रार करावी. केंद्रामार्फत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना त्वरित रुग्णालयात उपस्थित राहण्याबाबत कळवले जाईल. बुधवारपासून (1 नोव्हेंबर) राज्यभर ही सुविधा सुरू होत आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.

सरकारी रुग्णालयांत गंभीर आजार झालेले रुग्ण येत असतात. अशा वेळी वैद्यकीय अधिकारी नसल्यास गैरसोय होते. अशा परिस्थितीत नातेवाइकांना कुणाशी संपर्क साधावा, हे सुचत नाही. याची दखल घेत आरोग्य विभागाने 104 (टोल फ्री) क्रमांक सुरू केला आहे. आरोग्य सल्ला संपर्क केंद्रात तक्रार दाखल झाल्यावर रुग्णाच्या नातेवाइकांना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याबाबत माहिती देण्यात येईल. त्याचबरोबर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यास रुग्णालयात उपस्थित राहून रुग्णावर उपचार करण्याच्या सूचना देण्यात येतील. वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क न झाल्यास त्या तालुक्‍यातील तालुका आरोग्य अधिकारी व नंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यास याबाबत कळवण्यात येणार आहे.