इंदिरा गांधींचे नेतृत्व देशहिताचे - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

मुंबई - आणीबाणीचा कालखंड वगळला तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नेतृत्व देशाला पुढेच नेणारे असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी काढले. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा ठराव विधिमंडळात मांडला असता मुख्यमंत्री बोलत होते.

मुंबई - आणीबाणीचा कालखंड वगळला तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नेतृत्व देशाला पुढेच नेणारे असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी काढले. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा ठराव विधिमंडळात मांडला असता मुख्यमंत्री बोलत होते.

'आणीबाणीचे आम्ही कधीही समर्थन करणार नाही, त्या काळी माझे वडील आणि काकू यांना कारावास भोगायला लागला होता.

आणीबाणीबद्दल मतांतरे होती; मात्र यामुळे इंदिराजींच्या कार्याचे मोल कमी होत नाही, त्यांचे नेतृत्व देशाला पुढे नेणारे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. देशापुढील आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करण्याचे त्यांच्या नेतृत्वात गुण होते. काही लोक त्यांच्या नेतृत्वाचे वर्णन "गूँगी गुडिया' म्हणून करायचे, मात्र एकूणच इंदिराजींच्या कार्यास कुणीही नाकारण्याचे धाडस करणार नाही, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी "रणचण्डिका दुर्गा' अशा शब्दांत त्यांचे वर्णन केले होते,'' अशी आठवण फडणवीस यांनी करून दिली.

इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्य संग्रामात कारावास भोगला. चार वेळा पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व केले. वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा संभाळली. अशा विविध स्तरावर त्यांनी देशाचा विकास करीत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दबदबा निर्माण केला. अनेक देशांचे विरोध झुगारून 1974 मध्ये पोखरण येथे अणुचाचणी करून संरक्षण क्षेत्रात भारत समृद्ध असल्याचे जगाला दाखवून दिले. पंजाबमध्ये "ऑपरेशन ब्लू स्टार' करून दहशतवाद संपवला. यावरून श्रीमती गांधी यांच्या नेतृत्वातील सामर्थ्य दिसून येते, आशा शब्दांत फडणवीस यांनी कौतुक केले.

व्यक्तिगत आयुष्यात इंदिराजींनी अनेक चढउतार अनुभवले. त्या एखाद्या विशिष्ट जाती धर्माच्या नेत्या नव्हत्या, तर अखंड भारताच्या नेत्या होत्या. 30 ऑक्‍टोबर 1984 मध्ये त्यांचे निधन झाले, त्यापूर्वी शेवटच्या भाषणात इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, "माझ्या देशाची जनता कुठल्याही जाती धर्मात अडकून पडणार नाही, देशाचे अखंडत्व टिकवत पुढे नेईल, त्याग व सेवेचा आदर्श जगासमोर निर्माण करेल. मी आज आहे, उद्या कदाचित नसेनही, मात्र देशासाठी माझ्या रक्ताचा शेवटचा थेंबही खर्च करीन', अशी आठवण करून देत मुख्यमंत्री म्हणाले की, "इंदिरा युगाचा अंत झाला असला तरी देशाच्या विकासाचे त्यांचे कार्य कुणीही विसरू शकणार नाही.'