अबू सालेम, सिद्दिकीला जन्मठेप देण्याची सीबीआयची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

मुंबई - मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉंबस्फोटांच्या "ब' खटल्यात दोषी आढळलेल्या अबू सालेम आणि रियाज सिद्दिकी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी सीबीआयच्या वतीने मंगळवारी विशेष न्यायालयात करण्यात आली. शिक्षेच्या स्वरूपाबाबतचा सीबीआयचा युक्तिवाद मंगळवारी पूर्ण झाला.

अबू सालेमने केलेले कृत्य फाशीच्या शिक्षेच्या योग्यतेचे आहे; पण पोर्तुगालशी झालेल्या प्रत्यार्पण करारातील कलम 34 (क) नुसार त्याला फाशी होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची मागणी करत असल्याचे सीबीआयच्या वकिलांनी स्पष्ट केले. सालेम हा या स्फोटमालिकेचा मुख्य सूत्रधार, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम तसेच अनिस इब्राहिमचा खास माणूस होता. स्फोटांचा कट रचण्यापासून त्याच्या अंमलबजावणीपर्यंत त्याचा सहभाग होता. ओळख लपवण्यासाठी त्याने बनावट कागदपत्रे बनवली होती.

सालेमविरोधात या खटल्यासह आठ खटले सुरू असून, त्यासाठी त्याचे पोर्तुगालहून प्रत्यार्पण करण्यात आले होते. त्यापैकी प्रदीप जैन खून खटल्यात त्याला 2015 मध्ये दोषी ठरवण्यात आले आहे, असे सीबीआयचे विशेष सरकारी वकील दीपक साळवी यांनी न्यायालयात सांगितले. सालेमप्रमाणेच सिद्दिकीचाही या कटात सहभाग असल्याने त्यालाही जन्मठेप सुनावण्यात यावी, अशी मागणी सीबीआयच्या वतीने करण्यात आली.