आठवले यांच्याकडून तरुणांची हेटाळणी - तपासे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

मुंबई - 'लष्करात चांगले खायला, प्यायला मिळते. शरीरयष्टी चांगली राहते, असे सांगतानाच आठवले यांनी हातभट्टीची पिण्यापेक्षा तिथे रम वगैरे मिळते. त्यामुळे दलित समाजातील तरुणांनी सैन्यात जावे,'' असे धक्कादायक वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी (ता.1) पुण्यात केले. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आठवले यांच्यावर टीकेची झोड उठविल्यावर तरुणांना लष्करात जाण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे सांगत आठवले यांनी सारवासारव केली.

देशात दलित समाजावर एकीकडे मोठ्या प्रमाणावर अन्याय व अत्याचार होत असताना त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात कसे आणता येईल, याकडे लक्ष देण्याऐवजी दलित तरुणांनी रम पिण्याकरिता सैन्यात भरती व्हावे, हे रामदास आठवलेंच वक्तव्य दुर्दैवी असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते महेश तपासे यांनी म्हटले आहे. दलितांच्या शूरगाथेचे वर्णन करणारे विजयस्तंभ भीमा कोरेगावच्या लढाईनंतर उभारण्यात आले हे आठवले यांना माहीत नसावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महार रेजिमेंटची स्थापना करून एक वेगळा इतिहास रचला, याचाही आठवले यांना विसर पडला असावा. दलित समाजातील तरुणाला उद्योग रोजगाराचा सल्ला देण्याऐवजी असा भलताच सल्ला देऊन त्यांनी संपूर्ण दलित समाजाच्या शूरतेचा अपमान केल्याचे तपासे यांनी म्हटले. यावर सारवासारव करताना तरुणांना लष्करात जाण्यासाठी आपण प्रोत्साहन दिल्याचे सांगत आठवलेंनी आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचे शिर्डी येथे स्पष्ट केले.

Web Title: mumbai maharashtra news mahesh tapase talking