बालमृत्यू रोखण्यासाठी सातत्य राखावे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 जुलै 2017

मुंबई - देशातील अन्य राज्यांमध्ये माता व बालमृत्यू दर कमी असल्याच्या यादीत महाराष्ट्राचा क्रमांक वरचा असून, राज्यातील माता व बालमृत्यू रोखण्यासाठीच्या प्रयत्नांत आरोग्य विभागातील सर्वांनी सातत्य राखावे, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे केले. जागतिक लोकसंख्या दिनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित राज्यस्तरीय अंतरा इंजेक्‍शन एमपीएचा शुभारंभ, तसेच कुटुंब कल्याण कार्यक्रम गुणगौरव सोहळा, कायाकल्प पारितोषिक विजेत्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
या वेळी अंतरा कार्यक्रमांअंतर्गत आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी एमपीए इंजेक्‍शनचा शुभारंभ केला. महाराष्ट्रासाठी 33 हजार एमपीए इंजेक्‍शन व मॉड्युल, लाभार्थी कार्डचा पुरवठा करण्यात आला आहे. मुंबईसह पुणे, रायगड, नंदुरबार, नगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये हे इंजेक्‍शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये येत्या आठ दिवसांत ते उपलब्ध करून दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

कायाकल्प या स्वच्छ रुग्णालय पुरस्कारांमध्ये नाशिक जिल्हा रुग्णालयाचा 50 लाख रुपयांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शहरी भागात पुणे जिल्हा रुग्णालयाला द्वितीय क्रमांकाचे 20 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. यासह ग्रामीण भागात गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला 15 लाख रुपयांचे प्रथम, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील सस्तुर ग्रामीण रुग्णालयाला 10 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक देण्यात आले. वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय, डागा स्मृती रुग्णालय नागपूर, नंदुरबार जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांना 3 लाख रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. याशिवाय केज, कळवण, करकम्ब, शिरोडा, गांधीनगर, घोडेगाव, मंचर, बिलोली, दोडामार्ग, कसबा पावडा, विटा,अकलूज, हिंगोली, बिडकीन, वसमत, भोकर, वैभववाडी, गडहिंग्लज, उदगीर, देवळा, तुमसर, कागल, जव्हार या रुग्णालयांना एक लाख रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव
या वेळी कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या आशा कार्यकर्ती, अधिकारी, कर्मचारी, संस्थाप्रमुख व जिल्ह्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यात पुणे जिल्ह्यातील ओतूर आरोग्य केंद्राच्या आशा कार्यकर्ती रोहिणी शिंगोटे, कोल्हापूर जिल्ह्यातील पिंपळगाव आरोग्य केंद्राच्या आशा कार्यकर्ती नंदा बोटे, बीड जिल्हा रुग्णालयाच्या अधिपरिचारिका सोनी फुंदे, कोमल घोगरे, जव्हार उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भरत महाले, जालना स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामकृष्ण गौल यासह पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर आरोग्य केंद्र, उदगीर उपजिल्हा रुग्णालय, बीड जिल्हा रुग्णालय, गडचिरोली, गोंदिया, नाशिक जिल्हा परिषदा, गडचिरोली, चंद्रपूर येथील जिल्हा शल्यचिकित्सक, यासह चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांचा तसेच कोल्हापूर व बृहन्मुंबई महापालिकांचा गौरव करण्यात आला.