मंत्रालयात शुकशुकाट

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

सरसकट अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मारली दांडी
मुंबई - आजही कालप्रमाणे मुसळधार पाडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घरीच राहणे पसंत केले. यामुळे मंत्रालयात आज शुकशुकाट होता.

सरसकट अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मारली दांडी
मुंबई - आजही कालप्रमाणे मुसळधार पाडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घरीच राहणे पसंत केले. यामुळे मंत्रालयात आज शुकशुकाट होता.

सुमारे सात हजार इतकी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या असताना आज मंत्रालयाच्या सहाही मजल्यावर सामसूम होती. एकूण अधिकारी-कर्मचारी संख्येच्या सरासरी 80 टक्‍के इतकी उपस्थिती एरवी असते. सरासरी उपस्थितीच्या दोन टक्‍केसुद्धा उपस्थिती नसल्याचे आज दिसून आले. मंगळवारी मुंबई ठाण्यासह रायगड परिसरात जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळित झाले होते. रेल्वेसेवा, बेस्ट, खासगी प्रवासी वाहने आदी सेवा कोलमडल्या होत्या. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आवश्‍यक असेल तरच कार्यालयात यावे, असे सामान्य प्रशासन विभागाने म्हटले होते. त्यामुळे मंत्रालयात अत्यावश्‍यक सेवेचे कर्मचारी वगळता जवळपास नगण्य उपस्थिती होती.

नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह काही खात्याचे सचिव मंत्रालयात उपस्थित होते. मुख्य सचिव सुमीत मलिक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान कार्यालयाशी संवाद साधला. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आपत्तीकालीन व्यवस्थापन विभागाला भेट देऊन आढावा घेतला. एरवी बुधवारी मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांची गर्दी असते. मात्र, दोन दिवस पडणाऱ्या सततच्या पावसामुळे मंत्रालयात शुकशुकाट होता.

Web Title: mumbai maharashtra news mantralay empty