नियोजनबद्ध मराठा मोर्चाने मुंबई भगवी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

मुंबई - महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक आंदोलने झाली; पण बुधवारी (ता. ९) निघालेला मराठा मूक मोर्चा ‘न भूतो न भविष्यति’ असा ठरला.

महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांनी सहभाग घेऊन काढलेल्या अत्यंत शिस्तबद्ध मोर्चात मराठा समाजाच्या एकीचे दर्शन घडले. राज्याच्या कानाकोपऱ्याबरोबरच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आदी ठिकाणांहून हातात भगवा घेऊन मोर्चेकऱ्यांचे जथ्थे जथ्थे मुंबईकडे कूच करीत होते.

मुंबई - महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक आंदोलने झाली; पण बुधवारी (ता. ९) निघालेला मराठा मूक मोर्चा ‘न भूतो न भविष्यति’ असा ठरला.

महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांनी सहभाग घेऊन काढलेल्या अत्यंत शिस्तबद्ध मोर्चात मराठा समाजाच्या एकीचे दर्शन घडले. राज्याच्या कानाकोपऱ्याबरोबरच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आदी ठिकाणांहून हातात भगवा घेऊन मोर्चेकऱ्यांचे जथ्थे जथ्थे मुंबईकडे कूच करीत होते.

गर्दीमुळे मुंबईची गती मंदावली होती. प्रत्येकाने आपल्या मनात असलेली वेदना, तळमळ आणि सरकारकडून असलेल्या अपेक्षांना हातातील फलकांतून वाट मोकळी करून दिली. अत्यंत नियोजनबद्धरीत्या आलेल्या मराठ्यांच्या भगव्या वादळाने मुंबई सकाळपासून ढवळून निघाली.

भायखळ्यातील राणीच्या बागेपासून आझाद मैदानापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्रातील युवती आणि महिलांनी केले. मोर्चामध्ये विविध विषयांना प्रत्येकाने वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. काही जण विविध संदेश लिहिलेले फलक घेऊन आले होते. काहींनी शिवाजी महाराजांपासून मावळ्यांची वेशभूषा केली होती. लहान-मोठी मुलेही मोर्चात हिरिरीने सहभागी झाली होती. महिलांची संख्याही लक्षणीय होती. 

राजकीय बॅनरबाजीला विरोध
मोर्चाला सुरुवात होताच जे. जे. उड्डाणपुलावर असलेले राजकीय पक्षाचे बॅनर मोर्चेकऱ्यांनी फाडले. जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत असलेले प्रत्येक राजकीय पक्षाचे बॅनर मोर्चेकऱ्यांचे लक्ष्य ठरले. राजकीय नेते नेहमीच श्रेय लाटण्यासाठी पुढे येतात आणि खऱ्या अर्थाने मेहनत करणारा शेतकरी मागे राहतो. साहेबांचा मुलगा साहेब आणि शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होण्याची वेळ आली असल्यामुळे मोर्चाच्या मार्गावर असलेले सर्व बॅनर फाडून टाकण्यात आले. कोणत्याही पक्षाचा उल्लेख नसलेल्या बॅनरला मोर्चेकऱ्यांनी हातही लावला नाही. अशा शिस्तबद्धरीतीने मोर्चा आझाद मैदानाकडे रवाना झाला.

बालशिवाजींची वेशभूषा लक्षवेधी
शिवाजी महाराजांच्या जयघोषाने मोर्चाला सुरुवात झाली. अनेक लहान मुले बालशिवाजींची वेशभूषा करून मोर्चात सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रात्रीचा प्रवास करून ती मुंबईत दाखल झाली होती. सर्वच बालशिवाजींना मोर्चेकरी आदराने संबोधत होते. त्यांच्याबरोबर सेल्फीही घेत होते. इतर वेशभूषा केलेल्या मोर्चेकऱ्यांच्या तुलनेत ‘शिवाजी महाराज’ अनोखे ठरले.

हिंदू-मुस्लिम एेक्य
जे. जे. रुग्णालयाच्या परिसरात ५० जणांचा रेहमानी ग्रुप मोर्चेकऱ्यांच्या दिमतीला हजर होता. त्यांनी ५०० बॉक्‍स पाणी आणि ५०० किलो खजूर मोर्चात सहभागी झालेल्यांना वाटले. रेहमानी ग्रुपचे प्रेसिडेंट असिफ सरदार म्हणाले की, मराठा मोर्चा मराठ्यांनी काढला आहे. हक्कासाठी लढण्याचा हा उत्तम मार्ग आहे. या मोर्चाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आरक्षणासाठी मराठ्यांची एकजूट नक्कीच उपयोगी पडेल.

साधू महाराजही... 
मराठा मोर्चात धुळ्याहून आलेले साधू महाराजही सहभागी झाले होते. राजू महाराज (वय ५४) असे त्यांचे नाव. पायाला दुखापत झालेली असतानाही ते मोर्चात सहभागी झाले होते. ‘अनेक दिवस देवासाठी काम केले... आता समाजाकडेही थोडे लक्ष द्या, अशी विनंती ग्रामस्थांनी केल्यामुळे मी मूक मोर्चात सहभागी झालो. धुळ्यातून १० हजार मोर्चेकरी आले आहेत. त्यापैकीच मी एक. मुंबईकरांनी शिस्तबद्ध व्यवस्था केली आहे. एक कुटुंब सांभाळणे कठीण असते; पण अख्ख्या मोर्चाची जबाबदारी मुंबईने उत्तम पेलवली. मुंबई पोलिसांनी उत्तम व्यवस्था ठेवली आहे. नागरिक सहकार्य करत आहेत हे पाहून छान वाटले,’ असे ते म्हणाले.

‘रिव्हर्स मामां’ची चर्चा
खड्ड्यांमुळे मुंबईच्या रस्त्यावर सरळ चालण्याचे वांदे असताना मराठा मोर्चासाठी पुण्याहून आलेल्या ‘रिव्हर्स मामां’ची चर्चा रंगली. मोर्चेकरी सरळ तोंड करून चालत होते. ‘रिव्हर्स मामां’नी मात्र उलटे चालून मोर्चेकऱ्यांचे लक्ष वेधले. त्यांचे भव्य असे रूप आणि चालण्याची पद्धत उपस्थितांसाठी चर्चेचा विषय ठरली.

चोख बंदोबस्त
जागोजागी मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम बंदोबस्त ठेवला होता. भायखळा रेल्वेस्थानक ते आझाद मैदानापर्यंत अधिक पोलिस बंदोबस्त होता. मोर्चेकऱ्यांनीही रुग्णवाहिकेला वाट करून देत पोलिस यंत्रणेला सहकार्य केले.