कार्येकर्तेच स्वयंसेवक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

मुंबई - शांततेत आणि उत्साहात झालेल्या मराठा मोर्चा कार्यकर्त्यांनीच स्वयंसेवक होऊन केलेल्या वैद्यकीय मदतीमुळे विशेष ठरला. अनेक प्रसिद्ध डॉक्‍टर सेवेसी तत्पर होते. त्यामुळे तातडीने उपचाराची आवश्‍यकता असलेल्या मोर्चेकऱ्यांना दिलासा मिळाला. वैद्यकीय सेवेबरोबरच स्वच्छतेसाठी पुढे आलेले कार्येकर्ते आणि मुस्लिम कार्यकर्त्यांनी खजूर, बिस्किट आणि पाण्याची केलेली सोयही मोर्चाचे वेगळेपण ठरले.

मुंबई - शांततेत आणि उत्साहात झालेल्या मराठा मोर्चा कार्यकर्त्यांनीच स्वयंसेवक होऊन केलेल्या वैद्यकीय मदतीमुळे विशेष ठरला. अनेक प्रसिद्ध डॉक्‍टर सेवेसी तत्पर होते. त्यामुळे तातडीने उपचाराची आवश्‍यकता असलेल्या मोर्चेकऱ्यांना दिलासा मिळाला. वैद्यकीय सेवेबरोबरच स्वच्छतेसाठी पुढे आलेले कार्येकर्ते आणि मुस्लिम कार्यकर्त्यांनी खजूर, बिस्किट आणि पाण्याची केलेली सोयही मोर्चाचे वेगळेपण ठरले.

मोर्चेकऱ्यांसाठी जे.जे. रुग्णालय परिसरात पाणी, वैद्यकीय मदतीचे स्टॉल्स होते. रेहमानी ग्रुप्सच्या ६० कार्यकर्त्यांची फळीच रस्त्यावर होती. हे कार्यकर्ते वॉकीटॉकीद्वारे संपर्कात होते. जमियत उलमा ए महाराष्ट्रच्या कार्यकर्त्यांनी पाणीवाटप केले. जे.जे. रुग्णालयातील कामगार नेते कृष्णा रेणोसे यांच्यासह कर्मचारीही पाणी, बिस्किट वाटत होते. विशेष म्हणजे, या मोर्चात डॉक्‍टरही सहभागी झाले होते. डॉ. एस. एम. पाटील, डॉ. जी. एस. चव्हाण, डॉ. राजेश ढेरे, डॉ. पवन साबळे, डॉ. विकास कत्रे, डॉ. संजय सुरवसे, डॉ. देवकर यांच्यासह अनेक डॉक्‍टर मोर्चात सहभागी झाले होते. 

सीएसटी येथे एका मोर्चेकऱ्याला छातीत दुखू लागले. त्याला डॉक्‍टरांनी तपासून सेंट जॉर्जेस रुग्णालयात पाठविले. पायात गोळे येणे, चक्कर येणे अशा प्रकारच्या तक्रारी अनेक मोर्चेकऱ्यांच्या होत्या. ते मोर्चेकरी वैद्यकीय कक्षात येत होते, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. 

मोर्चा पुढे गेल्यानंतर त्या परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी काही कार्यकर्त्यांनी घेतली होती. पाण्याच्या बाटल्या, खाऊच्या पिशव्या उचलण्याचे काम कार्यकर्ते करत होते. अनुचित घटना टाळण्यासाठी कार्यकर्त्यांनी मानवी साखळी केली. त्या साखळीतून महिला पोलिस आणि महिला कार्यकर्त्या जात होत्या. परिमंडळ २ चे उपायुक्त ज्ञानेश्‍वर चव्हाण, सहायक आयुक्त दिलीप शिंदे यांच्यासह अधिकारी जे.जे. उड्डाणपुलावर तैनात होते. 

कार्यकर्त्यांचे सामाजिक भान
मोर्चा दुपारी १२ च्या सुमारास जे.जे. उड्डाणपुलावरून सीएसटीच्या दिशेने जात होता. मोर्चेकऱ्यांमुळे पुलावर प्रचंड गर्दी झाली होती. तेव्हा एक रुग्णवाहिका जे.जे. रुग्णालयाच्या दिशेने जात होती. सायरन वाजताच कार्यकर्त्यांनी रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. त्यानंतर काही वेळाने आणखी एक रुग्णवाहिका आली. तिलाही पोलिसांच्या मदतीने मार्ग दिला. 

मोटरसायकल रुग्णवाहिका तैनात
आरोग्य विभागाने मोटरसायकल रुग्णवाहिका सुरू केल्या आहेत. मोर्चादरम्यान जे.जे. परिसरात सुसज्ज रुग्णवाहिका आणि मोटरसायकल रुग्णवाहिकाही तैनात होती. मोटरसायकल रुग्णवाहिका पाहून अनेक जण छायाचित्र काढत होते.