प्रचंड गर्दीचा मोठा उत्साह

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

मुंबई - मराठा क्रांती मोर्चाला भायखळा येथील जिजामाता उद्यानापासून १५ मिनिटे आधीच सुरुवात झाली. कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहामुळे आयोजकांनी वेळेआधीच मोर्चाला सुरुवात केली. मोर्चादरम्यान पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. साध्या वेशातील पोलिसही जागोजागी तैनात होते. उंच इमारतींवरही दुर्बिण घेतलेले सशस्त्र पोलिस लक्ष ठेवून होते. ड्रोनच्या मदतीनेही पोलिस नजर ठेवून होते. 

आझाद मैदान तसेच भायखळा परिसरात मोर्चेकऱ्यांनी सकाळी ८ वाजल्यापासूनच जमण्यास सुरुवात केली होती. हातात भगवे झेंडे, डोक्‍यावर भगवी टोपी, गळ्यात भगवे उपरणे अशा वेशातील मोर्चेकरी  ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत होते. रेल्वेस्थानकांवर स्वयंसेवक मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करत होते. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आझाद मैदान; तसेच या दोघांना जोडणाऱ्या भुयारी मार्गांमध्येही काही मोर्चेकरी रात्रीपासूनच झोपले होते. ते सकाळी ८ वाजल्यापासूनच आझाद मैदानात आले. सकाळी ८.३० ते ९ च्या सुमारास आझाद मैदानात ५० हजारांपेक्षाही जास्त मोर्चेकरी जमले होते. जिजामाता उद्यान परिसरातील मोर्चेकऱ्यांची संख्याही तेवढीच होती. सकाळी १०.४५ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. ११.३०च्या सुमारास तो जे. जे. उड्डाणपुलावर आला. मोर्चात छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ; तसेच मावळे यांच्या वेशातील काही बालके होती.

आक्रमक सुरुवात
मोर्चाला काहीशा आक्रमक वातावरणातच सुरुवात झाली. सकाळी आझाद मैदानात आलेले भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांना मोर्चेकऱ्यांनी पिटाळून लावले. मोर्चेकऱ्यांनी भायखळा परिसरात काही राजकीय पक्षांचे फलकही उतरवले. काही सामाजिक संघटनांच्या नेत्यांची छायाचित्रे असलेले फलकही काढण्यात आले. मोर्चा शांततेत निघाला तरी अधूनमधून घोषणाबाजीही सुरू होती. त्यामुळे कुणीही घोषणा देऊ नयेत, असे आवाहन आयोजक वारंवार करत होते.