अपेक्षेपेक्षा ठिणगी मोठी!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

कोपर्डीतील ग्रामस्थांची प्रतिक्रिया

मुंबई - कोपर्डीत आमच्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर आम्ही उत्स्फूर्तपणे आंदोलन केले. त्या आंदोलनाची ठिणगी एवढ्या मोठ्या प्रमाणावर उडेल, असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया मराठा मोर्चासाठी मुंबईत आलेल्या कोपर्डीतील ग्रामस्थांनी बुधवारी दिली.

कोपर्डीतील ग्रामस्थांची प्रतिक्रिया

मुंबई - कोपर्डीत आमच्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर आम्ही उत्स्फूर्तपणे आंदोलन केले. त्या आंदोलनाची ठिणगी एवढ्या मोठ्या प्रमाणावर उडेल, असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया मराठा मोर्चासाठी मुंबईत आलेल्या कोपर्डीतील ग्रामस्थांनी बुधवारी दिली.

कोपर्डीतील ‘निर्भया’वर झालेल्या अत्याचाराच्या घटनेस एक वर्ष होत आहे. त्या घटनेनंतर एकवटलेला मराठा समाज, ‘निर्भयाला न्याय मिळावा, यासाठी समाजाने केलेले आंदोलन अभूतपूर्व आहे. एवढे मोठे आंदोलन उभे राहील, असे वाटले नव्हते. आमच्या मुलीला न्याय मिळायला हवा, एवढी आमची इच्छा होती. तिच्यासाठी समाज बांधव मोठ्या संख्येने उभे राहिले, याचे समाधान आहे, असे कोपर्डीचे सरपंच सतीश सुद्रिक, गावातील विलास सुद्रिक आणि अनंत मोरे म्हणाले. आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहेत. त्या सरकारने पूर्ण कराव्यात आणि दोषींना फासावर चढवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीच आमची मागणी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमच्या मागण्यांसाठी पुन्हा मोर्चा काढण्याची वेळ सरकारने आणू नये. मुंबईत आलेला मराठा राजकीय पक्षांसाठी आलेला नसून तो समाजासाठी आलेला आहे. त्यामुळे त्याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी. मराठ्यांचे ५७ मोर्चे निघाल्यानंतर सरकार गंभीर असेल, असे वाटते.
- नितीन गुडदे-पाटील, मोर्चाचे आयोजक, अमरावती

आमच्या समाजाचा प्रश्‍न असल्याने मोर्चात सहभागी व्हावे, अशी इच्छा होती. त्यासाठी आम्ही तयारीत होतो. मागण्यांबाबत आज सरकारने निर्णय न घेतल्यास पुढील मोर्चा कसा काढायचा, याची तयारी सुरू करू. तशी वेळ सरकारने आणू नये.
- कांता बोठे, सदस्य, छत्रपती महिला क्रांती मंच, अहमदनगर

स्वयंसेवक म्हणून आम्ही सकाळपासून काम करत आहोत. मुंबईत बाहेरगावाहून मोठ्या प्रमाणावर महिला आल्या आहेत. या मोर्चाची दखल सरकारने घ्यायला हवी. सरकारने अधिक वेळ न घालवता आमच्या मागण्या मान्य कराव्यात; अन्यथा पुढील मोर्चा तलवारी घेऊनच काढावा लागेल.
- साची चव्हाण, मुंबई