नेत्यांनाही दणका

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

मुंबई - मराठा क्रांती मोर्चाने सुरुवातीपासूनच राजकीय नेत्यांना बाजूला ठेवले आहे. कोणताही राजकीय नेता क्रांती मोर्चाच्या पुढेपुढे करण्याचा प्रयत्न करत असेल, तर मराठा कार्यकर्ते त्यांना तिथल्या तिथे सुनावत असल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या. बुधवारी (ता. ९)ही असे काही प्रकार आझाद मैदानात घडले.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार मोर्चा सुरू होण्यापूर्वीच आझाद मैदानात प्रवेश करत होते. त्या वेळी गेटवर उभ्या स्वयंसेवकांनी त्यांना ‘आपण भायखळ्याला जावून मोर्चात सहभागी व्हा,’ अशी विनंती केली.

तरीही ते व्यासपीठाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होते. हे लक्षात येताच मराठा तरुणांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. अखेर शेलार यांना माघारी फिरावे लागले. ‘मला विधानसभेत जायचे असल्याने मी माघारी आलो’, असा खुलासा नंतर शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 

क्रांती मोर्चाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटून आझाद मैदानात परतल्यावर सरकारने मान्य केलेल्या मागण्यांसंदर्भात माहिती देण्यासाठी आमदार नितेश राणे व्यासपीठावर गेले. त्यांना पाहताच मोर्चेकऱ्यांनी ‘खाली उतरा, खाली उतरा’ अशी घोषणाबाजी सुरू केली. मी कोणत्याही पक्षाच्या वतीने नव्हे; तर मराठा म्हणून येथे आलो आहे, असे सांगण्याचा राणे यांनी प्रयत्न केला; पण मोर्चेकऱ्यांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरूच ठेवली. अखेर छत्रपती संभाजी राजे यांनी व्यासपीठावर येत सरकारने मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य केल्याचे सांगितले. ‘आम्ही सगळे इथे मराठा म्हणून आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी आमदार राणे आणि आमदार नरेंद्र पाटील यांची नावे घेतल्यानंतर दोघेही व्यासपीठावर आले; मात्र तरुणांचा रोष पाहता राणे यांना भाषण करता आले नाही.

दिग्गजांनी व्यासपीठ टाळले
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अनेक मंत्री व आमदार भायखळा ते आझाद मैदानपर्यंत मराठा मोर्चात सहभागी झाले होते; मात्र त्यांनी व्यासपीठाकडे जाण्याचे टाळले.