आझाद हुंकार...!

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

राज्यभरात निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चांनी निर्माण केलेले भगवे वादळ आज मुंबईवर धडकले. मराठा समाजाचा हा ५८ वा मूक मोर्चा एका विराट शक्तीचा अनाहत हुंकार ठरला. सर्व दिशांना वेगवान संचार असलेली मुंबई या नादाने नादावली, केवळ एकदिशा मार्ग बनली. हा मार्ग होता या मोर्चाचा. ऑगस्ट क्रांतिदिनी आझाद मैदान संपूर्ण व्यापण्याची क्रांती करणारा हा मोर्चा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतरच विसर्जित झाला.

राज्यभरात निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चांनी निर्माण केलेले भगवे वादळ आज मुंबईवर धडकले. मराठा समाजाचा हा ५८ वा मूक मोर्चा एका विराट शक्तीचा अनाहत हुंकार ठरला. सर्व दिशांना वेगवान संचार असलेली मुंबई या नादाने नादावली, केवळ एकदिशा मार्ग बनली. हा मार्ग होता या मोर्चाचा. ऑगस्ट क्रांतिदिनी आझाद मैदान संपूर्ण व्यापण्याची क्रांती करणारा हा मोर्चा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतरच विसर्जित झाला. मुख्यमंत्र्यांनी, आरक्षणासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती, मराठा विद्यार्थ्यांच्या ईबीसी मर्यादेसाठी सवलतवाढ आदींबाबत दिलेल्या आश्‍वासनानंतर मोर्चेकऱ्यांचे काही अंशी समाधान झाले असले तरी विरोधी पक्षांचे मात्र समाधान झालेले दिसले नाही. सभागृहात त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून दिवसभर गोंधळ घातला.

मुंबई - आजच्या क्रांतिदिनी मुंबईत मराठा मोर्चाच्या क्रांतिकारी त्सुनामीची साक्ष मुंबईने अनुभवली. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘जय जिजाऊ जय शिवराय’ अशा घोषणांनी अवघी मुंबापुरी आज दणाणून गेली होती. ऐतिहासिक आझाद मैदानात मुंबईच्या इतिहासातला सर्वांत मोठा मोर्चा म्हणून मराठा क्रांती मोर्चाची आज नोंद झाली. पोलिसांच्या अंदाजानुसार राज्यभरातून दीड लाखांहून अधिक कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.  

मध्य मुंबईत रेल्वे, लोकल व रस्त्यावर आज फक्‍त हातात भगवा झेंडा घेतलेले व ‘एक मराठा, लाख मराठा’चे काळे टी-शर्ट परिधान केलेले मराठा बांधव व भगिनींचे जथ्थेच्या जथ्थे लोटत होते. मुंबईला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांवर केवळ मराठा मोर्चात सहभागी होणाऱ्या वाहनांमुळे मुंबई ते ठाणे, मुंबई ते पनवेल हे महामार्ग गर्दीने फुलून गेले होते. दक्षिण मुंबईतील वाहतूक ठप्प झाली होती. मराठ्यांचा हा अखेरचा क्रांती मोर्चा संयम, शिस्त व आचारसंहितेचे पालन करत मुंबईत दाखल झाल्याचे नियोजनबद्ध चित्रदेखील सर्वांना चकित करणारे होते. भायखळा येथील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा महामोर्चा सकाळी बरोबर ११ वाजता सुरू झाला. त्यासाठी आझाद मैदानात व्यासपीठ उभारण्यात आले होते.

दुपारी १२.३०च्या सुमारास युवतींच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा आझाद मैदानात पोचला. मराठा क्रांती मोर्चाच्या परंपरेप्रमाणे मोजक्‍या शाळकरी व महाविद्यालयीन युवतींची अत्यंत प्रभावी व आक्रमक भाषणे झाली. आवाज, आवेश व हातवारे करत या युवतींनी मराठ्यांच्या व्यथा व समस्या मांडल्या.

मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाकडे पाठपुरावा करणार
तीन लाख शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण देणार
मराठा विद्यार्थ्यांना ६०५ हून अधिक अभ्यासक्रमांत सवलती
१० लाख विद्यार्थ्यांना फायदा
प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा मुलांसाठी वसतिगृह
ईबीसीसाठी गुणांची अट ६० टक्‍क्‍यांवरून ५० टक्के
कोपर्डीचा निकाल अंतिम टप्प्यात