'राष्ट्रवादी' विद्यार्थी प्रदेशाध्यक्षसाठी आमदारपुत्रांची मोर्चेबांधणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

सिनेट निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर निवड प्रक्रियेची लगबग

सिनेट निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर निवड प्रक्रियेची लगबग
मुंबई - राज्यात सिनेट निवडणुकांसाठीची रेलचेल सुरू झालेली असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीचीही चर्चा सुरू झाली आहे. "राष्ट्रवादी' विद्यार्थी प्रदेशाध्यक्षाचे पद मागील अनेक महिन्यांपासून रिक्‍त आहे. या पदावर आपल्या मुलाची वर्णी लागावी यासाठी "राष्ट्रवादी'च्या अनेक आमदारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी काही आमदार आपल्या मुलांना विद्यार्थ्यांमध्ये जाऊन विविध प्रश्‍नांवर काम करण्यासाठीचे धडेही देत असल्याचे सांगण्यात येते.

राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांची गेल्या काही महिन्यांत "राष्ट्रवादी' युवक प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने हे पद रिक्‍त राहिले आहे. दरम्यान, राज्यातील विद्यापीठांमध्ये नवीन विद्यापीठ कायदा अमलात आल्याने विद्यापीठांमध्ये निवडून जाणाऱ्या सिनेट निवडणुकांचे बिगुल वाजले असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर "राष्ट्रवादी' विद्यार्थी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेची लगबग सुरू झाली आहे. राजकीय नेत्यांसोबतच कोकणातील आमदार भास्कर जाधव, माजी आमदार राजन पाटील आदी आजी-माजी आमदारांच्या मुलांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते.

एकेकाळी बीड येथील माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून हकालपट्टी केलेले सुरेश धस यांच्या मर्जीतील "राष्ट्रवादी'चे तरुण कार्यकर्ते महेबूब शेखही या चर्चेत असून, त्यासोबत मुंबई आणि परिसरात मागील काही वर्षांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष म्हणून अनेक आंदोलने केलेले आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडलेले अमोल मातेले यांच्या नावाला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. मुंबई विद्यापीठात मातेले यांच्या नेतृत्वाखाली अनेक लढे उभारले गेले असल्याने "राष्ट्रवादी'च्या अनेक नेत्यांनी सिनेट निवडणुका नजरेसमोर ठेवून त्यासाठी निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा जिल्हा व तालुका स्तरावरील विद्यार्थी प्रतिनिधींकडून व्यक्‍त केली जात आहे.

राज्यातील विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची तयारी जोरदार असल्याची माहिती एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने "सरकारनामा'शी बोलताना दिली, तर संघर्ष यात्रेच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष निवडीचे काम थोडे रखडले होते, अशी कबुलीही देण्यात आली.