राज्य मंत्रिमंडळातही मोदी फॉर्म्युला वापरणार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

पितृपक्षानंतर घडामोडींना वेग; फेरबदलाची चिन्हे

पितृपक्षानंतर घडामोडींना वेग; फेरबदलाची चिन्हे
मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर राज्य मंत्रिमंडळातही मोठ्या प्रमाणात फेरबदल होणार असून, यासाठी पितृपक्ष संपल्यावर राज्यात घडामोडींना वेग येणार आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केंद्रीय मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा बदलण्यात आल्याचे चित्र असून, मोदी सरकारच्या धर्तीवरच राज्यातही फेरबदल होणार असल्याची चिन्हे आहेत.

राज्यात शिवसेना - भाजप युती सरकार सत्तेवर असून, राज्य मंत्रिमंडळात आता शेवटचा विस्तार आणि फेरबदल होणार आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 23 कॅबिनेट, तर 16 राज्यमंत्री आहेत. विधानसभेच्या एकूण आमदार संख्येप्रमाणे मंत्रिमंडळात आणखी तीन जागा रिक्‍त आहेत. फडणवीस सरकारलाही येत्या ऑक्‍टोबरमध्ये तीन वर्षे पूर्ण होत असल्याने मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार असेल. यामध्ये तीनही रिक्‍त जागा भरण्यात येणार असून, विद्यमान मंत्र्यांच्या रिपोर्ट कार्डनुसार काही जणांना डच्चू देण्यात येणार आहे. तसेच काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती मिळणार असल्याची चिन्हे आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या धर्तीवरच भाजपच्या काही मंत्र्यांवर "पक्ष कार्याची जबाबदारी' सोपविण्यात येणार असल्याने अनेकांच्या पोटात गोळा उठला आहे. 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा विडा फडणवीस यांनी उचलला असून, मंत्रिमंडळ विस्तारात ते कठोर निर्णय घेणार आहेत. या वेळी भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या आणि कार्यक्षमता दाखवू न शकलेल्या काही मंत्र्यांना वगळण्यात येणार असल्याची चर्चा आहे. महेता यांची चौकशी सुरू होणार असली तरी, महेता यांचे केंद्रातील हितसंबंध लक्षात घेता त्यांना वगळण्याची शक्‍यता कमी आहे; मात्र महेता यांच्याकडील गृहनिर्माण खाते काढून घेतले जाण्याची शक्‍यता आहे.

शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला स्थान मिळाले नसल्याने शिवसेना नेते प्रचंड खवळले आहेत. केंद्रातील सत्तेत सामील होताना ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला केंद्रातील आणखी एक मंत्रिपद मिळणे अपेक्षित होते. मात्र, आता ही शक्‍यता धूसर झाल्याने शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील शिवसेनेचा कोटा पूर्ण झाला आहे. मंत्रिमंडळात सेनेचे पाच कॅबिनेट, तर सात राज्यमंत्री आहेत.

राणे यांच्या आशा पल्लवीत
केंद्रातील घडामोडीनंतर राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राणे यांनी भाजपसमोर दोन अटी ठेवल्या असून, त्यावर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांत चर्चा सुरू आहे. राणे यांना राज्यात न ठेवता राज्यसभेवर पाठविण्यात यावे, अशी राज्यातील नेत्यांची अपेक्षा आहे. मात्र, राज्यसभा दिली तर नीतेश राणे यांना राज्यात राज्यमंत्री करावे आणि नीलेश राणे यांना विधान परिषद द्यावी, अशी राणे यांची मागणी असल्याचे सांगण्यात आले. किंवा राज्य मंत्रिमंडळात स्वतःला मोठे खाते द्यावे आणि 2019 साठी नीतेशची आमदारकी आणि नीलेशला लोकसभेचे तिकीट निश्‍चित करण्याची त्यांची मागणी असल्याचे सांगण्यात आले.