मुंबई महापालिकेत कडक शिस्तीचा अधिकारी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 जुलै 2017

शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपची खेळी

शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपची खेळी
मुंबई - शिवसेना- भाजपच्या राजकारणात बळीचा बकरा ठरलेले अर्थ व लेखा अधिकारी सुरेश बनसोडे यांना शासनात पुन्हा बोलविल्यानंतर आणखी कडक शिस्तीचा अधिकारी मुंबई महापालिकेत पाठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महापालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेचा कारभार तपासण्यासाठी "योग्य' अधिकारी शोधण्याची कार्यवाही वित्त विभागाने सुरू केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

शिवसेना आणि भाजपमधील दुफळी लपून राहिली नाही. मुंबई महापालिकेतील सत्ता या भांडणाच्या मागीलचा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 82 जागा जिंकल्या असताना भाजपने सत्तेत सहभागी न होता "वॉच डॉग'ची भूमिका वटविण्याचा निर्णय घेतला. पालिकेतील शिवसेनेच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेच्या इतिहासात प्रथमच शासनाच्या सेवेतील अर्थ व लेखा संचालक सुरेश बनसोडे यांची "ऑडिटर' म्हणून सहा महिन्यांपूर्वी नेमणूक करण्यात आली. बनसोडे हे शिवसेनेच्याच कलाने कारभार करत असल्याचा संशय भाजपला होता. या सर्व राजकारणातून बनसोडे यांना महापालिकेने शासनाच्या सेवेत परत पाठवल्याची चर्चा प्रशासनात सुरू आहे.

बनसोडे यांना महापालिकेने कार्यमुक्‍त केले असले तरी त्यांच्या जागेवर नवीन अधिकारी पाठविण्यात येणार आहे. शिवसेनेच्या कारभारावर अंकुश ठेवणारा अधिकारी कोण असावा, याची चाचपणी वित्त विभागात सुरू आहे. याबाबत आश्‍यकता भासल्यास मुंबईबाहेरील अधिकारी देखील नियुक्‍त करण्याचा विचार राज्य सरकार करीत असल्याचे समजते.