नांदेड- वाघाळा महापालिकेसाठी 11 ऑक्‍टोबरला मतदान

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

बृहन्मुंबई, नागपूर, कोल्हापूर व पुण्यातील रिक्तपदांसाठीही मतदान

बृहन्मुंबई, नागपूर, कोल्हापूर व पुण्यातील रिक्तपदांसाठीही मतदान
मुंबई - नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच बृहन्मुंबई, पुणे व नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या दोन रिक्तपदांच्या पोट निवडणुकांसाठी 11 ऑक्‍टोबर 2017 रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 12 ऑक्‍टोबर रोजी होईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी बुधवारी येथे केली.

सहारिया यांनी सांगितले की, नांदेड- वाघाळा महानगरपालिकेची मुदत 31 ऑक्‍टोबर 2017 रोजी संपत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्र.116, पुण्यातील प्रभाग क्र. 21अ नागपूरमधील प्रभाग क्र.35-अ आणि कोल्हापूरमधील प्रभाग क्र. 11 व 77 च्या रिक्तपदांच्या पोट निवडणुकांसाठीदेखील मतदान होत आहे. या सर्व ठिकाणी 16 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात होईल. 11 ऑक्‍टोबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.