नारायण राणेंची भेट मैत्रीच्या नात्याने - तटकरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

मुंबई - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केवळ मैत्रीच्या नात्यातून भेट घेतली, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी सांगितले. राणे हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याशी राजकारणाच्या पलीकडची माझी मैत्री आहे. कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांची भेट घ्यावी, या हेतूनेच मी त्यांना भेटलो. यातून कोणत्याही प्रकारचा राजकीय अर्थ काढण्याचे कारण नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

राणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये यावे, याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही, असाही खुलासा तटकरे यांनी केला. कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी कोणत्या पक्षात जावे, हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे; मात्र अशा काळात त्यांची भेट घेणे महत्त्वाचे वाटले. याअगोदरही त्यांच्या राजकीय चढ-उताराच्या काळात मी त्यांना नेहमीच भेटत आलो आहे. कधी कधी त्यांनी स्वत:हून मला बोलावून घेतले होते, अशी माहिती तटकरे यांनी दिली.