मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आगामी विधान परिषद निवडणुकीत विरोधकांनी मोट बांधण्याची सुरवात केली आहे. या तिन्ही पक्षांना युती करताना अडचण येऊ नये यासाठी तगडा अपक्ष उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजीनामा दिल्याने विधान परिषदेच्या एका जागेसाठी 7 डिसेंबरला मतदान होत आहे. एकास एक असा हा सामना असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यातच नारायण राणे यांना उमेदवारी न देता भाजपने एक पाऊल मागे घेत शिवसेनेला सोबत ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. मात्र भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला या वेळी धक्का देण्याची रणनीती विरोधकांनी आखण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी शिवसेनेचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू असून, एखादा तगडा अपक्ष उमेदवार दिल्यास शिवसेना सोबत येऊ शकते असे चिन्हे आहेत. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत दिवसेंदिवस दरी वाढत असताना या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची भूमिका निर्णायक राहणार आहे.
शिवसेनेकडे 63 आमदारांचे संख्याबळ असून, कॉंग्रेस राष्ट्रवादीकडे एकत्रित 83 आमदार आहेत. यामुळे या तिन्ही पक्षांकडे 146 इतके निर्णायक बहुमत होत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने नारायण राणे यांना थांबवून शिवसेनेची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अपक्ष उमेदवार मैदानात उतरल्यास शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकत्रितपणे भाजप उमेदवाराच्या विरोधात एक होऊन दणका देण्याचेही चिन्हे आहेत.
|