पंकजा मुंडे, दानवेंवर गैरव्यवहाराचे आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 31 मे 2017

मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची "आप'ची मागणी

मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची "आप'ची मागणी
मुंबई - महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पोषण आहारातील निविदांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून (आप) करण्यात आला. मंत्री मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही "आप'ने केली आहे. महिला बचत गटांऐवजी काळ्या यादीतील कंत्राटदारांना पोषण आहाराची कंत्राटे दिल्याचा आरोप मुंडे यांच्यावर "आप'च्या प्रवक्‍त्या प्रीती शर्मा मेनन यांनी केला.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून राजीनामा देण्यास भाग पाडणाऱ्या "आप'ने आता मुंडे यांच्याबरोबरच दानवे यांच्यामागे ससेमिरा लावला आहे. मुंडे यांनी गैरव्यवहार केला असून, त्यात दानवेही सहभागी असल्याचा आरोप "आप'ने केला. पोषण आहाराच्या 777 कोटी रुपयांच्या कंत्राटांपैकी 88 टक्के कंत्राटे वेंकटेश्वर महिला औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था लिमिटेड, महालक्ष्मी महिला गृहउद्योग ऍण्ड बाल विकास बहुद्देशीय औद्योगिक सहकारी संस्था आणि महाराष्ट्र महिला सहकारी गृहउद्योग संस्था लिमिटेड या तीन बोगस आणि काळ्या यादीतील संस्थांना देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

राज्य शासनाने 2009मध्ये "टेक होम रेशन्स'चे करार वेंकटेश्वर महिला औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था लिमिटेड, महालक्ष्मी महिला गृहउद्योग ऍण्ड बालविकास बहुउद्देशीय औद्योगिक सहकारी संस्था आणि महाराष्ट्र महिला सहकारी गृहउद्योग संस्था लिमिटेड या संस्थांनाच दिले होते. या संस्थांच्या चौकशीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर या संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात आले होते. महिला मंडळांनी स्वयंसाहाय्य समूह चालविण्यासाठी महिलांचा वापर केला नाही; परंतु फक्त निविदा काढल्या आणि नंतर उप-कामे खासगी कंपन्यांना दिली, असे या संस्थांच्या चौकशी अहवालात म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर 2014मध्ये महिला बचत गटांना कंत्राट देण्यात आले होते. मात्र, महिला व बालकल्याण विभागाने पुन्हा बचत गटांना डावलून काळ्या यादीतील याच संस्थांना कंत्राटे दिल्याचा आरोप "आप'कडून करण्यात आला. या प्रकरणात दानवे यांचाही सहभाग असल्याचा "आप'चा दावा आहे. जालन्यातील मोरेश्वर बॅंकेकडून आर. डी. दानवे यांच्या नावे पाच लाख रुपयांचे व्यवहार झाले असून, हे रावसाहेब दानवे असल्याची शंका ही मेनन यांनी उपस्थित केली आहे.