'राष्ट्रवादी युवक'ची राज्यात "परिवर्तन यात्रा'

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 31 मे 2017

केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयांचा "पर्दाफाश' करणार
मुंबई - राज्यात सध्या विरोधकांची संघर्ष यात्रा, शिवसेनेचे शेतकरी संपर्क अभियान; तर भाजपचे शिवार संवाद अभियान अशी राजकीय रणधुमाळी सुरू असताना आता राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने "परिवर्तन यात्रा' काढण्याचा नारा दिला आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयांचा "पर्दाफाश' करणार
मुंबई - राज्यात सध्या विरोधकांची संघर्ष यात्रा, शिवसेनेचे शेतकरी संपर्क अभियान; तर भाजपचे शिवार संवाद अभियान अशी राजकीय रणधुमाळी सुरू असताना आता राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने "परिवर्तन यात्रा' काढण्याचा नारा दिला आहे.

"राष्ट्रवादी युवक'ची ही यात्रा 125 तालुक्‍यांतून जाणार असून यामध्ये शिक्षण व रोजगार याबाबत केंद्र व राज्य सरकारने केलेल्या घोषणांना लक्ष्य केले जाणार आहे. "राष्ट्रवादी युवक'चे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेची तयारी सुरू असून 15 जूनपासून ही यात्रा सुरू होणार आहे. केंद्र सरकारने बेरोजगारांना रोजगार व महाविद्यालयीन शिक्षण याबाबत घोषणा केल्या, काही निर्णयदेखील घेतले. मात्र अंमलबजावणीच्या पातळीवर निव्वळ फसवेगिरी असल्याचा दावा संग्राम कोते यांनी केला आहे. या निर्णयांचा लेखाजोखा घेत सरकारच्या अंमलबजावणीचा पर्दाफाश करण्यासाठीच ही यात्रा काढत असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने विद्यार्थी व युवकांमध्ये प्रभावी संघटन सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून ही परिवर्तन यात्रा काढली जाणार आहे. जूनमध्ये शाळा- महाविद्यालये सुरू होत असल्याने थेट युवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न यात्रेच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यात्रेत अजित पवार
दरम्यान, "राष्ट्रवादी युवक'ची ही यात्रा असली तरी पक्षाचे नेते अजित पवार प्रत्येक तालुक्‍यात सहभागी होणार असल्याची माहिती संग्राम कोते पाटील यांनी दिली. त्यासोबतच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व खासदार सुप्रिया सुळे आदी नेतेदेखील काही तालुक्‍यांत यात्रेत सहभागी होणार असून युवकांशी संवाद साधत परिवर्तनाची हाक दिली जाणार आहे.