पोलिसांच्या आहारभत्त्यात दुपटीने वाढीचा निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

मुंबई - पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आहारभत्त्यात घसघशीत वाढ करण्यात आली असून, आधीच्या तुलनेत भत्त्याची रक्कम जवळपास दुपटीने वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना हा वाढीव लाभ 1 डिसेंबर 2017 पासून मिळणार आहे.

पोलिसांचे आरोग्य व मनोधैर्य उत्तम ठेवण्यासाठी त्यांना चांगला व सकस आहार मिळणे आवश्‍यक असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भत्तावाढीचा निर्णय घेतला. यात पोलिस उपनिरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक, छायाचित्रकार यांना मिळणारा 840 रुपयांचा आहार भत्ता आता 1 हजार 500 रुपये तसेच, पोलिस हवालदार, पोलिस नाईक, पोलिस शिपाई (सशस्त्र व नि:शस्त्र) यांना मिळणारा 700 रुपयांचा भत्ता आता 1 हजार 350 रुपये करण्यात आला आहे.

पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांना कर्तव्यानिमित्त त्यांचे राहते घर आणि पोलिस ठाणे यापासून दूर राहावे लागते. अशा वेळी त्यांना उत्तम आहार घेता येण्यासाठी आहारभत्ता देण्यात येतो. पोलिसांसमोरील वाढलेली आव्हाने आणि आहारांच्या किमतीत झालेल्या वाढीचा विचार करता त्यांच्या आहारभत्त्यात वाढ करणे गरजेचे होते. त्यांना मिळणाऱ्या आहारभत्त्यात 2011 पासून कोणतीही वाढ झाली नव्हती.

Web Title: mumbai maharashtra news police food allowance double decission