राणेंच्या उपद्रव मूल्याचा शिवसेना-कॉंग्रेसला त्रास

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

मुंबई - नारायण राणे यांना स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्यास भाग पाडून त्याचा कॉंग्रेस आणि शिवसेनेला त्रास देण्याची भाजपने यशस्वी खेळी खेळल्याची चर्चा सुरू आहे.

मुंबई - नारायण राणे यांना स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्यास भाग पाडून त्याचा कॉंग्रेस आणि शिवसेनेला त्रास देण्याची भाजपने यशस्वी खेळी खेळल्याची चर्चा सुरू आहे.

भविष्यात आपला प्रथम क्रमांकाचा राजकीय शस्त्रू शिवसेनाच असल्याचे राणे यांनी वारंवार दाखवले आहे. आता नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यावर राणे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांत जुगलबंदी होण्याची दाट शक्‍यता आहे. सत्तेत राहून सरकारविरोधी भूमिका घेत असाल तर बाहेर पडा, असे थेट शिवसेनेला आव्हान करताना भाजपला मर्यादा होत्या.

आता तशी परिस्थिती निर्माण झाल्यास शिवसेनेच्या अंगावर राणे यांना सोडता येईल, असा भाजपचा कयास असल्याचे राजकीय जाणकरांचे मत आहे. म्हणजेच पाहुण्याच्या काठीने विंचू मारण्याची यशस्वी खेळी भाजपने खेळल्याचे मानण्यात येते. दुसरीकडे नारायण राणे यांचा कॉंग्रेसलादेखील त्रास होणार आहे. राणेंना कॉंग्रेस सोडण्यास भाग पाडून कोकणात कॉंग्रेसला भगदाड पाडण्यात भाजप यशस्वी झाला आहे. राणे यांच्यामुळे कॉंग्रेसला मोठे नुकसान होणार नसले तरी, राणे कॉंग्रेस नेत्यांवर दररोज टीका करू शकतात. त्यामुळे राणे यांच्या टीकेला उत्तर देण्यात कॉंग्रेस नेत्यांचा बराच वेळ खर्ची करण्याची भाजपची रणनीती असल्याची चर्चा आहे. तसेच राणे यांच्या मार्फत कॉंग्रेसचे आणखी नेते आणि पदाधिकारी गळाला लावण्याची दुसरी खेळी भाजपकडून खेळली जाणार असल्याची चर्चा आहे.