लोकप्रियतेला ओहोटी लागल्याची भाजपमध्ये दबक्‍या आवाजात चर्चा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

मुंबई - दिवसेंदिवस विरोधात जाणाऱ्या घटनांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याची चर्चा प्रदेश भाजपमध्ये सुरू झाली आहे.

मुंबई - दिवसेंदिवस विरोधात जाणाऱ्या घटनांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याची चर्चा प्रदेश भाजपमध्ये सुरू झाली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे उद्‌घाटन गुजरातमध्ये धूमधडाक्‍यात साजरे केले. यामागे गुजरात विधानसभा निवडणूक जिंकणे हा हेतू असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली. त्यानंतर लगेच मुंबईत एल्फिन्स्टन येथे रेल्वे पुलावर चेंगराचेंगरीत 22 मुंबईकरांचा बळी गेला. या दुर्घटनेने बुलेट ट्रेनला कडाडून विरोध सुरू झाला असताना, मोदी यांच्या या निर्णयावर जोरदार टीका होऊ लागली आहे. गुजरातमधून सुरू झालेली "विकास वेडा झाला आहे' ही सोशल मीडिया कॅम्पेन मोदी यांच्या लोकप्रियतेला बॅकफूटवर येण्यास भाग पाडत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे राज्य भाजपचे नेते, मंत्री हवालदिल झाले आहेत. काही मंत्री तर खासगीत मोदी यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली असल्याचे कबूल करत आहेत, तर भाजपचे पदाधिकारी खासगीत मान्य करीत आहेत. आगामी काळातही परिस्थिती अशीच राहिली, तर आम्हाला निवडणुकीला सामोरे जाणे कठीण होईल, अशी कबुली राज्य मंत्रिमंडळातील एका सदस्याने खासगी चर्चेत दिली आहे.