'राष्ट्रवादी'च्या खेळीने शिवसेनेची एकाकी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या निमित्ताने भाजपच्या मंत्र्यांवर हक्कभंग ठराव आणताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केलेल्या खेळीने एकटे पडलेल्या शिवसेनेची जखम गुरुवारी पुन्हा भळभळली. सरकारच्या दोन पक्षांत विसंगती असेल तर लोकांचे नुकसान होते, असा अचूक नेम शिवसेनेवर साधत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ सदस्य सुनील तटकरे यांनी दोन पक्षातल्या विसंवादाला छेडले.

मुंबई विद्यापीठाच्या प्रकरणाची गंभीर दखल राज्यपालांनी घेतली आहे. राज्यपालांमार्फतच या प्रकरणाची चौकशी सुरू असून, कुलगुरू संजय देशमुख दोषी असतील तर त्यांच्यावर निश्‍चित कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले. मुंबई विद्यापीठाचे 231 निकाल आतापर्यंत लागले असून, विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी अडचण होऊ नये यासाठी मदत केली जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.