अंबाबाई मंदिरात आता शासन नियुक्त पुजारी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

मुंबई - पंढरपूर, शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात शासन नियुक्त पुजारी नेमण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची घोषणा गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत गुरुवारी केली. येत्या तीन महिन्यांत हा कायदा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई - पंढरपूर, शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात शासन नियुक्त पुजारी नेमण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची घोषणा गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत गुरुवारी केली. येत्या तीन महिन्यांत हा कायदा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिरातील सोन्याचे अलंकार, देवीचे चांदीचे दागिने, कोट्यवधींची रोकड, तसेच भाविकांनी देवीला अर्पण केलेल्या किमती ऐवजावर पुजाऱ्यांनीच डल्ला मारला आहे. विधानसभेत कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनी आक्रमक होत पुजाऱ्यांच्या बेसुमार लुटीच्या कथा ऐकवत या लुटीची "एसआयटी' चौकशी करण्याची मागणी करताना अंबाबाईला पुजाऱ्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी केली. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, डॉ. सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके, तसेच कॉंग्रेसचे सत्यजित पाटील यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

राजेश क्षीरसागर यांनी अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांनी कशी लूट चालवली आहे याचा पाढा सभागृहात वाचला.

डॉ. रणजित पाटील यांनी उत्तर देताना अंबाबाई मंदिरात शासन नियुक्त पुजारी नेमण्यासाठी लवकरच स्वतंत्र कायदा करण्यात येईल असे स्पष्ट केले. तसेच, विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन येत्या तीन महिन्यांत याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल. कोल्हापुरातील आमदारांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन याबाबत स्वतंत्र बैठक येत्या 15 दिवसांत घेण्यात येईल, असे सांगून सीआयडी चौकशीचा अहवाल अंतिम टप्प्यात असून येत्या 15 दिवसांत तो खुला केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

अंबाबाईचे डोळेही चोरले...
राजेश क्षीरसागर यांनी पुजाऱ्यांच्या लुटीच्या कथा सभागृहात सांगितल्या. अजित ठाणेकर या पुजाऱ्याने अंबाबाईची साडी-चोळी ही पारंपरिक वेशभूषा बदलून घागरा-चोलीची वेशभूषा केली. इतकेच नव्हे, तर या पुजाऱ्यांनी यापूर्वी अंबाबाईचे दोन डोळेही चोरले होते. देवीच्या गाभाऱ्यात गुटखा खाल्ला जातो. पुजाऱ्यांनी देवीच्या मूर्तीची विटंबनाही केली आहे, याकडे लक्ष वेधले. पुजाऱ्यांनी अंबाबाईच्या मूर्तीतही घोळ केला. मूर्तीत तीन किलो "एमसीआयएल' आढळून आले असून, धातूच्या पट्ट्या तसेच लोखंडी खिळेही असल्याचे निष्पन्न झाल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

गाभाऱ्याबाहेरील 52 कोटींचा वाद न्यायालयात
पश्‍चिम देवस्थान समितीने गाभाऱ्याबाहेरील जमा होणारी वर्षाची 52 कोटींची देणगी पुजाऱ्यांना न देता समितीला देण्याची मागणी केली होती. त्याला पुजाऱ्यांनी न्यायालयात आव्हान दिले. मात्र, गाभाऱ्याच्या आतील कोट्यवधींच्या देणग्या, अलंकार पुजाऱ्यांच्या खिशात जात असून, वर्षाला हे पुजारी 350 कोटींची मालमत्ता जमवीत असल्याचा गौप्यस्फोट क्षीरसागर यांनी केला. त्यामुळे अजित ठाणेकर या पुजाऱ्याकडून देवीच्या पूजेचा हक्क काढून तो बहुजन समाजातील जुन्या जाणत्या मंडळींना देऊन त्यांना राज्य सरकारने पगारावर नेमावे, अशी सूचना शिवसेनेचे चंद्रदीप नरके यांनी केली. शासन नियुक्त पुजाऱ्याची नियुक्ती अंबाबाई मंदिरात करावी, असे त्यांनी सांगितले.

Web Title: mumbai maharashtra news The priest appointed by the government in Ambabai temple