जवान आणि किसान मरत आहेत सरकार काय करतंय? - राज ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 जून 2017

मुंबई - सीमेवर जवान आणि देशात शेतकरी रोज मरत आहेत. तरीही भारतीय जनता पक्षाचे सरकार खुशाल आहे. केवळ थापा मारून केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेले हे सरकार काही कामाचे नाही, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाला त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकरी संपाबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, ""शेतकऱ्यांच्या संपाला माझा पाठिंबा आहे. मात्र, गिरणी कामगारांप्रमाणे शेतकऱ्यांचे हाल होऊ नयेत. यापूर्वी विरोधात असताना कर्जमाफी देता येणार नाही; हे यांना माहीत नव्हते का? कॉंग्रेस आघाडीचे सरकार घालवण्यासाठी भाजप जनतेशी, शेतकऱ्यांशी खोटे बोलला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी. ते कर्जमाफी जाहीर करू शकतात. मात्र, मनावर घेत नाहीत.''

ठाकरे म्हणाले, की मात्र, फक्त कर्जमाफीने हा प्रश्न सुटणार नाही. स्वामिनाथन समितीच्या अन्य शिफारशीही अमलात आणल्या पाहिजेत. भाजपच्या तीन वर्षांच्या काळात नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आंदोलनाला पक्षीय लेबल लावू नका. सरकारने घोषणा करून ठेवल्या आहेत. पैसे नाहीत आणि योजनांना मात्र गोंडस नावे दिली आहेत.''

देशाने जवानांच्या मागे उभे राहणे गरजेचे असताना देश क्रिकेट सामने पाहण्यात गुंग असल्याची टीका त्यांनी केली.