रामराजेंच्या मध्यम मार्गाने कोंडी फुटली

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

विरोधकांचा गोंधळ अन्‌ सत्ताधाऱ्यांच्या बहिष्कारानंतर सामंजस्याची भूमिका

विरोधकांचा गोंधळ अन्‌ सत्ताधाऱ्यांच्या बहिष्कारानंतर सामंजस्याची भूमिका
मुंबई - गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधी सदस्यांनी घातलेला अभूतपूर्व गोंधळ आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत कामकाजावर घातलेला बहिष्कार, यामुळे निर्माण झालेली कोंडी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलेल्या बैठकीनंतर गुरुवारी अखेर फुटली.

विरोधकांना संसदीय आयुध वापरण्याचा अधिकार असण्याबरोबर सत्तारूढ पक्षाला स्पष्टीकरण मांडण्याची संधी मिळणेही आवश्‍यक असल्याचा निर्वाळा रामराजे नाईक निंबाळकर यांनी देत मध्यम मार्ग काढला. तर, सभागृहातील मोकळ्या जागेत येऊन न्याय मागणे हा नैसर्गिक न्याय असल्याचे सांगत विरोधकांची आयुधे अबाधित राहावीत, अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ सदस्य सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी सभागृहाचे कामकाज आज सकाळी दहा वाजता सुरू झाल्यापासून चार वेळा तहकूब झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गटनेत्यांची बैठक सभापतींच्या दालनात झाल्यानंतर रुसलेल्या सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही अधिकार अबाधित ठेवत सामंजस्याची भूमिका घेण्याची तयारी दाखवल्याने या नाट्यावर पडदा पडला.

जबाबदारीची जाणीव
विधान परिषदेत विरोधी पक्षांचे बहुमत असल्याने सत्ताधाऱ्यांना बोलू दिले जात नसल्याने कालपासून सत्ताधारी पक्षाने कामकाजावर बहिष्कार टाकला होता. यावर भाष्य करताना निंबाळकर म्हणाले, की यानिमित्ताने सरकारच्या बाजूने समज, गैरसमज असल्याचे उघडकीस आले आहे. विरोधकांना मोकळ्या जागेत येऊन घोषणा देण्याचा अधिकार आहे. तसेच, सरकारची बाजू पटलावर येणेही आवश्‍यक असल्याचे सांगत दोन्ही बाजूंना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली.

वेळेचे बंधन पाळा
निंबाळकर यांनी सभागृहाच्या कामकाजाविषयी विस्तृत टिप्पणी करताना सभागृहात प्रश्नोत्तराचा तास दुपारी बारा वाजताच सुरू होईल असे ठामपणे सांगितले. तसेच, अपवादात्मक परिस्थितीतच यापुढे स्थगन प्रस्ताव प्रश्नोत्तराच्या तासांपूर्वी स्वीकारले जातील, असे स्पष्ट करीत सदस्यांनी वेळेचे बंधन पाळण्याची आवश्‍यकता त्यांनी व्यक्त केली. तसेच तासभर लांबणाऱ्या "लक्षवेधी' जास्तीत जास्त पंधरा मिनिटांत संपवल्या जाव्यात, अशीही अपेक्षा व्यक्त केली. सुनील तटकरे यांनी विरोधकांची भूमिका स्पष्ट करताना, याप्रकरणी विरोधकांचीच चूक आहे असा संदेश जाणे योग्य नाही. सभागृहाच्या मोकळ्या जागेत उतरणे हा आमचा नैसर्गिक हक्क आहे असे सांगितले.

तुरळक उपस्थितीमुळे कामकाज तहकूब
सत्ताधारी सदस्यांचा कामकाजावर बहिष्कार, तसेच विरोधकांची उपस्थितीही तुरळक असल्यामुळे पुरेशा सदस्यसंख्येअभावी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी आज विधान पारिषदेच्या सकाळच्या विशेष सत्राचे संपूर्ण कामकाज दोन वेळा तहकूब केले. त्यानंतर नियमित कामकाजही दोनदा स्थगित करण्यात आले.