कोकण कृषी विद्यापीठातील नोकरभरती पारदर्शकच - पांडुरंग फुंडकर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

मुंबई - दापोली (जि. रत्नागिरी) येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी सहायक भरती प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार झाला नसून, या संदर्भातील तक्रार खोटी होती, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सोमवारी विधान परिषदेत सोमवारी दिली.

कॉंग्रेसच्या आमदार हुस्नबानू खलिफे यांनी या संदर्भात तारांकित प्रश्‍न मांडला होता. या प्रकरणाची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली. त्याला उत्तर देताना कृषिमंत्री फुंडकर म्हणाले, की विद्यापीठाच्या कृषी सहायक या पदासाठीच्या भरतीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार आली होती. त्यानुसार महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेकडून अहवाल मागवण्यात आला.

विद्यापीठाने प्रा. डी. एन. महाले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी केली. या भरती प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले नाही. तक्रार खोटी होती, असे दिसून आले आहे. त्यामुळे विद्यापीठ स्तरावर ही तक्रार निकाली काढण्यात आली आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आवश्‍यकता नाही. मात्र, विद्यापीठात रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मस्टरवर घेण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, असे फुंडकर यांनी सांगितले. हे कर्मचारी 10 ते 12 वर्षे विद्यापीठात कंत्राटी तत्त्वावर काम करत आहेत. त्यांना किमान वेतनही मिळत नाही. कृषी सहायक भरतीमध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थान मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणीही आमदार खलिफे यांनी केली होती.