वाहन खरेदी करतानाच नोंदणी क्रमांक घ्या!

सिद्धेश्‍वर डुकरे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

मुंबई - दुचाकी अथवा चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी शोरूमध्ये गेल्यानंतर यापुढे वितरक अर्थात डीलरच वाहन खरेदीबरोबर वाहन नोंदणी क्रमांकदेखील देणार आहे. अगदी व्हीआयपी नंबरसुद्धा डीलरच देणार आहे. या प्रकारची सिस्टिम लवकरच परिवहन विभाग अंमलात आणणार असून, याबाबतची फाइल अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या निर्णयामुळे आरटीओमधील दलालांचा बाजार बसणार असून, वाहन खरेदीप्रेमींचा वेळ व पैसा वाचणार आहे. ऑनलाइन पद्धतीने वाहन नोंदणीची प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे यामध्ये कोणतेही कारण सांगण्यास सबब राहणार नाही.

दुचाकी अथवा चारचाकी वाहनाची खरेदी करण्यासाठी शोरूमध्ये जावे लागते. तेथून वाहन नंबर नोंदणीसाठी आरटीओ कार्यालयात न्यावे लागते. तेथे वाहन नोंदणी क्रमांक मिळतो. यामध्ये वेळ आणि पैसा खर्च होतो. तसेच दलाल पाठ सोडत नाहीत. वेळप्रसंगी वाट पाहावी लागते. सध्या या पद्धतीने वाहन नोंदणी होते. त्यामुळे परिवहन खात्याकडे ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. शिवाय दलालांच्या विळख्यामुळे परिवहन विभागाची बदनामीदेखील होते. यावर मात करण्यासाठी वाहन नोंदणी क्रमांक देण्याची जबाबदारी डीलरकडे सोपवण्याचा विचार परिवहन विभाग गंभीरपणे करीत होते. सध्या वाहन, वाहनाची चेसी, इतर तांत्रिक बाबी आदी सर्व जबाबदारी डीलरवरच आहे. केवळ नोंदणी क्रमांकासाठी परिवहन कार्यालयाचा संबंध येत आहे. तो टाळता येणे शक्‍य आहे. हा विचार करून परिवहन विभागाने डीलरकडेच वाहन नोंदणी क्रमांक देण्याची जबाबदारी टाकली आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या वाहनांचे अधिकृत डीलरची यादी अथवा नोंद परिवहन विभागाकडे आहे. त्यामुळे अशा प्रकारे या डीलरशी समन्वय साधताना कोणतीच अडचण येणार नाही, याचा विश्‍वास परिवहन विभागाला आहे.

विक्रेता, परिवहन विभाग यांच्यात समन्वय
अधिकृत विक्रत्याची नोंद परिवहन विभागाकडे आहे. परिवहन विभाग आणि डीलर यांच्यात ऑनलाइन समन्वय साधला जाईल. ज्या वेळी ग्राहक वाहन खरेदी करण्यासाठी डीलरच्या शोरूमला गेला असता, त्यास त्या त्या श्रेणीतील वाहन क्रमांक ऑनलाइन दिसतील. वाहन खरेदी निश्‍चित झाल्यानंतर डीलर लगेच वाहन नोंदणी करून क्रमांक देईल. हे ऑनलाइन पद्धतीने होईल. त्यामुळे वाहन खरेदी झाल्यावर तात्काळ नोंदणी होऊन क्रमांकासह वाहन रस्त्यावर येईल.

Web Title: mumbai maharashtra news registration number at vehicle purchasing