पीकविम्यासाठी कापणीची आकडेवारी लवकर कळवा - फुंडकर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

मुंबई - शेतकऱ्यांच्या पीकविम्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मूग आणि उडदाच्या पीककापणीची आकडेवारी 28 सप्टेंबरपर्यंत कृषी विभागाला कळवावी, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृहावर कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृषी आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते.

अनेकदा पीककापणीची आकडेवारी अद्ययावत नसल्याने शेतकऱ्यांना पीकविमा देताना राबविण्याच्या प्रक्रियेत विलंब होतो. आकडेवारी प्राप्त होताच ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून पीकविमा प्रक्रियेला सुरवात करण्यात येईल आणि ऑक्‍टोबरअखेरपर्यंत शेतकऱ्याला पीकविम्याची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात मिळावी, या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. खरीप हंगामाअखेर सोयाबीनच्या पिकाचे जे नुकसान झाले आहे त्याच्या पाहणीकरिता संबंधित क्षेत्रातील कृषी अधिकाऱ्यांनी त्वरित पीकक्षेत्राला भेटी द्याव्यात व झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून अहवाल विभागाला सादर करावा, असे निर्देशही कृषिमंत्र्यांनी या वेळी दिले; तसेच राज्यातील रिक्त असणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या 48 पदांपैकी 11 तालुक्‍यांमध्ये 1 मंडळ कार्यालय आहे. त्यामुळे त्या ठिकाणी उपलब्ध अधिकाऱ्यांची संख्या लक्षात घेता सद्यस्थितीत या जागा भरणे प्रस्तावित नाही. पदे पदोन्नतीने भरण्यास पदोन्नती समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून, प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला असल्याची माहिती कृषिमंत्र्यांनी दिली.