छापील किमतीपेक्षा अधिक पैसे घेतल्यास तक्रार करा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 जुलै 2017

मुंबई - केंद्र सरकारने 1 जुलैपासून वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू केला आहे. यात छापील किमतीतच सर्व कर अंतर्भूत आहेत. मात्र, जीएसटीच्या नावाखाली छापील किमतीपेक्षा अधिक दर आकारून फसवणुकीचे प्रकार होत आहेत. अशा विक्रेत्यांविरुद्ध ग्राहकांनी वैधमापन विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केले आहे.

या संदर्भात बापट म्हणाले, की पूर्वीचा उत्पादनशुल्क, विक्रीकर यांसह इतर सर्व करांचे एकत्रीकरण "जीएसटी'त करण्यात आले आहे.

"जीएसटी'मुळे ग्राहकांचा फायदा होणार असून, यामुळे महागाई वाढणार नसून वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत. त्यासाठी उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी कराच्या परताव्यात मिळणारा लाभ ग्राहकांपर्यंत पोचवला पाहिजे. नफेखोरी रोखण्यासाठी कायद्यात तरतूद आहे. या कराची अंमलबजावणी यशस्वीपणे करण्यासाठी सर्वसामान्य ग्राहकांनीही अधिक सतर्कता दाखवली पाहिजे.

काही दुकानदार व व्यापारी जीएसटीच्या नावाखाली ग्राहकांकडून छापील किमतीपेक्षा अधिक दर आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. हे बेकायदा असून ग्राहकांनी सजग राहावे. फोन करून आपली तक्रार नोंदवावी अथवा आपल्या जिल्ह्यातील वैधमापन अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन मंत्री गिरीश बापट आणि वैधमापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक व विशेष पोलिस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

येथे करा तक्रार...
फेसबुक पेज - Legal Metrology Maharashtra Consumer Grievances
ई-मेल - dclmm_complaints@yahoo.com
व्हॉट्‌सऍप क्रमांक - 9869691666
हेल्पलाइन क्रमांक - 022-22622022