मोदींना पर्याय नाही हा भ्रम - शरद यादव

मोदींना पर्याय नाही हा भ्रम - शरद यादव

मुंबई - सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशात नरेंद्र मोदींना पर्यायच नाही, हा भ्रम पद्धतशीरपणे पसरवला असल्याची टीका संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) बंडखोर नेते शरद यादव यांनी शुक्रवारी केली. केवळ 31 टक्के मतांच्या जोरावर मोदी सत्तेपर्यंत पोचले असल्याकडेही त्यांनी या वेळी लक्ष वेधले.

माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित "सांझी विरासत बचाओ' अभियानात बोलत होते. शरद यादव यांच्या नेतृत्वाखाली सध्या देशभरातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आजच्या कार्यक्रमास कॉंग्रेसचे नेते आनंद शर्मा, सीपीआयएमचे सीताराम येचुरी, सीपीआयचे डी. राजा, स्वाभिमानीचे राजू शेट्टी, सपचे अबू आझमी यांच्यासह तृणमूल कॉंग्रेस, राष्ट्रीय जनता दल आदी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी शरद यादव म्हणाले की, "अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेले भाजप सरकार गाय, घरवापसी आणि लव्ह जिहादसारख्या विषयात अडकले. इतिहासात पहिल्यांदाच ताजमहालवरूनही वादंग निर्माण झाला, अशी परिस्थिती देशात यापूर्वी कधीच नव्हती. या परिस्थितीत भाजप विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची आवश्‍यकता असल्याचे मतही त्यांनी व्यक्‍त केले.

धर्माच्या नावावर देशाचे नागरिकत्व ठरविण्याचा खटाटोप भाजप सरकार करत आहे. त्यासाठी विधेयक आणण्याची तयारीही सरकारने चालविली आहे, असा आरोप येचुरी यांनी केला. व्होट बॅंकेच्या राजकारणासाठी समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्यात येत आहे. भारतीयत्वाच्या रक्षणासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे येचुरी म्हणाले.

कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी सांगितले, केंद्रातील भाजप सरकार फक्त मालक वर्गाचे आहे. त्यामुळे कामगार, मजूर आणि कष्टकरी वर्ग आपल्या बाजूने आहे. नोटाबंदी लागू करताना पंतप्रधान मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था काळ्या पैशावर चालते, असे सांगून कष्टकऱ्यांचा अपमान केला आहे, तर आता जीएसटीच्या नावाखाली करदहशत माजविण्यात येत असल्याचा आरोप शर्मा यांनी केला.

सत्ता नसली की कॉंग्रेसला धर्मनिरपेक्ष आणि छोट्या पक्षांची आठवण येते. सत्तेत आल्यावर मात्र या पक्षांना संपविण्याचा कार्यक्रम राबविला जातो. या धोरणामुळेच देशात कॉंग्रेसची ही अवस्था झाली आहे, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला; तर आता एकत्र येण्याची भाषा करणारी कॉंग्रेस निवडणुका आली की स्वबळाची भाषा करते. अशा धोरणाने भाजपला रोखता येणार नसल्याचे अबू आझमी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com