शिवसेनेचे मंत्री आदेशाच्या प्रतीक्षेत

शिवसेनेचे मंत्री आदेशाच्या प्रतीक्षेत

संघटनेला हवे शेवटचा शेतकरी समाधानी होईपर्यंत आंदोलन
मुंबई - कर्जमुक्‍ती ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांची मागणी पूर्णत: प्रत्यक्षात येईपर्यंत आंदोलन सुरू ठेवायला हवे, अशी पक्षसंघटनेची भावना आहे. मात्र, उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री नेहमीप्रमाणे शांत रहाणार की भाजपच्या अडचणीत भर घालणार, असा प्रश्‍न आहे. आजवर पक्षाची भूमिका सरकारी निर्णयाच्या विरोधात असली तरी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री शांत असल्याने भाजपला कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागलेले नाही.

ही प्रथा कायम ठेवणार की भाजपच्या प्रभावात न राहता पक्षविस्तारासाठी शिवसेनेचे मंत्री आक्रमक होणार याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे समजते.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेनेत तणाव निर्माण झाला असता मध्यरात्री उशीरा मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेवून शिवसेनेच्या मंत्र्यांनी संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली होती. आता अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळालेल्या दिलाशाने समाधान मानायचे काय, यावर शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये विचारमंथन सुरू आहे. सरकारचा भाग असलेल्या शिवसेनेने या आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यामुळे भाजप-शिवसेनेतील मतभेद उघड झाले आहेत.

कर्जमाफीची घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनावर नैतिक विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात ठिकठिकाणी शेतकरी प्रश्‍नावर आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न शिवसेनेने जाहीरपणे सुरू ठेवला आहे. परदेशात असलेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलन सुरू ठेवा, असे पत्रक काढले असल्याने सत्तेत भागीदार असलेली शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. सत्तेतील सहकारी अशा रितीने आक्रमक झाल्याचा योग्य तो उपयोग करण्यासाठी फडणवीस यांचे विरोधक शिवसेना नेत्यांशी बंद दरवाजामागे चर्चा करत आहेत, मंत्रिमंडळात या आंदोलनाचा आवाज उमटावा यासाठी शेतकरी नेते, तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेशी संपर्क साधला असल्याचे विश्‍वसनीयरित्या समजते.

उद्या मंत्रिमंडळाच्या बैटकीत सेना आक्रमक होणार काय? किमान यासंबंधात चर्चा व्हावी अशी मागणी करणार काय? असे विचारले असता शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने अद्याप यासंबंधी कोणताही निर्णय झालेला नसल्याचे मान्य केले. उद्धव ठाकरे यांच्या निरोपाची प्रतीक्षा आहे, असेही समजते.

आंदोलनानंतर उद्या प्रथमच मंत्रिमंडळाची बैठक होते आहे. यावेळी भूमिका काय असेल असे विचारले असता शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी अखेरच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेपर्यंत शिवसेनेचा संघर्ष कायम असेल, असे नमूद केले.

आजवर शिवसेनेने कोणत्याही विषयात आम्हाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोध केलेला नाही, मुंबई महापालिका निवडणुकी दरम्यान त्यांनी काही मिनिटांसाठी बैठकीवर बहिष्कार टाकला होत, असे नमूद करत भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने कर्जमाफीची मागणी मान्य झाली असल्याने आता विरोध करण्याचा प्रश्‍न कुठे उद्भवतो, असा प्रश्‍न भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने उपस्थित केला. काही जण सरकारमध्ये असले तरी ते चालवणे आपली जबाबदारी आहे, असे मानत नसल्याचा टोमणा मुख्यमंत्र्यांनी पत्रपरिषदेत मारला होता. त्या वेळी आंदोलकांशी चर्चा घडवून आणण्यासाठी शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी मदत केल्याचे गुपीतही फोडले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com