अहिल्यादेवींच्या नावास सोलापूर विद्यापीठाचा विरोध

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मुख्यमंत्र्यांचे आदेश व्यवस्थापन परिषदेने धुडकावले

मुख्यमंत्र्यांचे आदेश व्यवस्थापन परिषदेने धुडकावले
मुंबई - सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठास दिले होते. मात्र, विद्यापीठाने तसा प्रस्ताव पाठवला तर नाहीच; उलट, नामविस्तार केल्यास विद्यापीठाच्या विकासात अडथळा होईल. त्यामुळे विद्यापीठाचे सध्याचे नाव आहे तसेच ठेवावे, असे राज्य सरकारला कळवले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी (ता. 8) विधान परिषदेत दिली.

नाशिकचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जयवंत जाधव यांनी या संदर्भातला तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. मे 2017 मध्ये मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठास पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासंदर्भातला प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले होते. त्यावर सोलापूर विद्यापीठाने कळवले की, विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत विविध संघटना व राजकीय पक्षांनी दिलेली निवेदने विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवण्यात आली होती. जातीय तेढ निर्माण होऊन विद्यापीठाच्या निकोप विकासाला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सोलापूर विद्यापीठाचे नाव सोलापूर विद्यापीठ राहील, असा सर्वानुमते घेण्यात आलेला निर्णय कायम ठेवावा, असे विद्यापीठाने राज्य सरकारला कळवले आहे, अशी माहिती तावडे यांनी लेखी उत्तरात दिली.

पूर्व प्राथमिक नियंत्रणात
पूर्व प्राथमिक शिक्षणाचे नियंत्रण करण्यासाठी धोरण आणि कायद्याचा मसुदा तयार करण्यात येत आहे. या प्रस्तावित कायद्यामध्ये पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्याचे धोरण, परवानगी, शिक्षण शुल्क, पायाभूत सुविधा, प्रवेश अभ्यासक्रम या बाबींचा समावेश करण्यात येत आहे, त्यामुळे नर्सरीचे (पूर्व प्राथमिक) वर्ग सरकारच्या नियंत्रणाखाली येतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री तावडे यांनी नाशिकचे आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्‍नाला दिली.

"टीईटी'चा निर्णय प्रलंबित
जिल्हा परिषदांच्या सेवेत कायम झालेल्या वस्तीशाळा शिक्षकांना, निमशिक्षकांना "टीईटी'तून (शिक्षक पात्रता परीक्षा) वगळण्याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारला शिफारस केली आहे; मात्र, अजून केंद्र सरकारने यावर निर्णय घेतला नसल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री तावडे यांनी आमदार कपिल पाटील (मुंबई) यांच्या तारांकित प्रश्‍नाच्या उत्तरात दिली.