गणेशोत्सवातील दणदणाट क्षीण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान
मुंबई - गणेशोत्सव म्हणजे ध्वनिक्षेपकांचा दणदणाट, असे जणू समीकरणच बनले होते; परंतु यंदा ध्वनिक्षेपकांच्या आवाजासंदर्भात न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेमुळे गणेशोत्सवातील आवाजच कमी झाल्याचे आढळत आहे.

सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान
मुंबई - गणेशोत्सव म्हणजे ध्वनिक्षेपकांचा दणदणाट, असे जणू समीकरणच बनले होते; परंतु यंदा ध्वनिक्षेपकांच्या आवाजासंदर्भात न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेमुळे गणेशोत्सवातील आवाजच कमी झाल्याचे आढळत आहे.

सुमारे 80 टक्के साउंड सर्व्हिस व्यावसायिकांनी डीजे किंवा तत्सम साउंड सर्व्हिस देण्यास नकार दिल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उर्वरित 20 टक्के व्यावसायिकांनी धोका पत्करून साउंड सिस्टिम सर्व्हिसच्या ऑर्डर घेतल्याचे असोसिएशन ऑफ लाउड स्पीकर ऍण्ड लायटिंग इक्विपमेंट (पाला)च्या वतीने सांगण्यात आले. परंतु, दुसरीकडे दणदणाट कमी असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये मोठा व्यवसाय होतो; मात्र यंदा त्यावरही गदा आल्याचे पाला संघटनेच्या मॅन्युअल यांनी सांगितले. सरकारने पूर्ण बंदीऐवजी सुवर्णमध्य काढावा, असे आवाहनही त्यांनी केले.

गणेशोत्सव समन्वय समितीनेही मंडळांसाठी काही नियम जारी केले होते. मंडळांनी त्यांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. ते अनेक मंडळांनी गंभीरपणे घेतल्यानेही अनेक ठिकाणचा आवाज मंदावला आहे. मात्र, विसर्जन मिरवणुकीतील पारंपरिक ढोल-ताशांचा आवाज कमी झालेला नाही.

ध्वनिप्रदूषणापासून सुटका
गणेशोत्सवातील लाउड स्पीकरच्या दणदणाटाचा त्रास अनेक नागरिकांना होतो. असह्य आवाजामुळे हृदयरोग, दमा, ऐकू कमी येणे, इतकेच नव्हे; तर बहिरेपणाही येतो. कधी कधी जिवावरही बेतू शकते. मात्र, यंदा न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे लाउड स्पीकरच्या ध्वनिप्रदूषणापासून नागरिकांची काही प्रमाणात का होईना, सुटका झाली आहे.