दक्षिण कोरिया करणार 'समद्धी'ला मदत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

मुंबई - महाराष्ट्रातील बहुचर्चित समृद्धी महामार्गासाठी आर्थिक कर्ज देण्याचे आश्‍वासन दक्षिण कोरियाचे उपपंतप्रधान व अर्थमंत्री किम डॉंगयून यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाला दिले आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पात दक्षिण कोरियाला गुंतवणूक करण्याची इच्छा असल्याचे डॉंगयून यांनी नमूद केले आहे. दक्षिण कोरियातील कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची इच्छा असल्याचेही या वेळी सांगण्यात आले आहे.

दक्षिण कोरियातील पायाभूत सुविधा खात्याशी समृद्धी महामार्ग, तसेच स्मार्ट सिटीबद्दल करार करण्यात आला आहे. महामार्गाच्या उभारणीसाठी तंत्रज्ञान, कायदेशीर सल्ला याबाबत दक्षिण कोरिया महाराष्ट्राला मार्गदर्शन करेल. या संबंधात स्पेशल पर्पज व्हेइकल स्थापन करण्यात येईल. कोरियातील तज्ज्ञ तसेच महाराष्ट्रातील अधिकारी यावर काम करतील.

आज झालेल्या भेटीत डॉंगयून यांनी महाराष्ट्रात गुंतवणूकविषयक प्रस्तावात दाखवलेल्या विशेष उत्साहाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी आनंद व्यक्‍त केला आहे. महाराष्ट्र हे परदेशी गुंतवणूक खेचणारे सर्वांत महत्त्वाचे राज्य आहे. भारतात सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रातच येते, असेही त्यांनी नमूद केले. पोस्कोच्या कंपनी कार्यालयालाही त्यांनी आज भेट दिली.