परिपूर्ण माहिती असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी - सुभाष देशमुख

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत 22 सप्टेंबर 2017 अखेर 56.59 लाख शेतकरी कुटुंबांचे ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांमध्ये 77.29 लाख खातेदारांचा समावेश आहे. ज्या जिल्ह्यातील सर्व बॅंकांची परिपूर्ण माहिती प्राप्त होईल, त्या जिल्ह्यात तातडीने कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कर्जमाफी संदर्भात माहिती देताना देशमुख म्हणाले, व्यापारी बॅंका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांकडून कर्जदार शेतकऱ्यांची विहित नमुन्यातील माहिती (66 रकाने) ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. व्यापारी बॅंकांची माहिती संबंधित बॅंकांच्या सक्षम अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करण्यात येत आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांची माहिती सहकार विभागाच्या लेखापरीक्षकांमार्फत पडताळणी करण्यात येत आहे. मंगळवार (ता. 3)पर्यंत विविध 32 व्यापारी बॅंकांनी 20.54 लाख खातेदारांची, तर 30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी 36.36 लाख खातेदारांपैकी 20.35 लाख खातेदारांची कर्जाबाबतची माहिती दिली आहे. त्यापैकी 15 लाख खातेदारांची माहिती सहकार विभागाच्या लेखापरीक्षकांनी प्रमाणित केली आहे.

'बॅंकांनी खातेदारांची माहिती ऑनलाइन अपलोड केल्यानंतर योजनेच्या पात्रतेबाबत सॉफ्टवेअरद्वारे छाननी करण्यात येत आहे. छाननीमध्ये पात्र ठरलेल्या खातेदारांबाबत चावडीवाचनामध्ये आलेल्या सूचना व माहितीचा विचार करून तालुकास्तरीय समितीद्वारे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्यात येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू नसलेल्या गावांत कर्जमाफीच्या माहितीचे चावडीवाचन करण्यात आले आहे. अन्य गावांत ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर चावडीवाचन करण्यात येणार आहे,'' असेही देशमुख यांनी सांगितले.

'शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी त्यांचा आधार क्रमांक बॅंकेकडे देणे बंधनकारक आहे. आधार क्रमांक दिलेल्या पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी या योजनेचा लाभ देण्यास शासन प्रयत्नशील आहे. कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना देय असणारी प्रोत्साहनपर रक्कम त्यांच्या बचत खात्यात जमा करण्यात येणार आहे,'' असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.