कर्जमाफी योग्य पण उचित भाव हवा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 जून 2017

शिवार सभेत शेतकऱ्यांची मागणी; भाजप नेत्यांचा मुख्यमंत्र्यांना फीडबॅक

शिवार सभेत शेतकऱ्यांची मागणी; भाजप नेत्यांचा मुख्यमंत्र्यांना फीडबॅक
मुंबई - विक्रमी कर्जमाफीच्या घोषणेबद्दल महाराष्ट्रातील शेतकरी सरकारला धन्यवाद देईल, अशी भावना व्यक्‍त करतानाच शिवार सभांमध्ये शेतकऱ्यांनी मालाला योग्य भाव मिळावा, अशी मागणी केल्याची माहिती भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आहे. शेतकरी संपाच्या पार्श्‍वभूमीवर काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपतील प्रमुख नेत्यांशी चर्चा केली.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तसेच प्रत्येक मंत्र्याने महाराष्ट्रातील परिस्थितीबाबतचा तोंडी अहवाल या वेळी सादर केला. कर्जमाफी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना अत्यंत गरजेच्या आहेत, असे मत राज्यातील शेतकरी व्यक्‍त करीत असल्याचे या वेळी मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आल्याचे समजते.

काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक मंत्र्याला तसेच उपस्थित आमदारांना परिस्थितीचा लेखाजोखा विचारला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश नेत्यांनी विरोधी विचारसरणीचे राजकीय कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते, अशी माहिती दिली. शेतकरी पेरणीच्या कामात गुंतला असताना काही नेते हे आंदोलन पेटवत असल्याचा भाजप आमदारांचा कयास आहे. सरकार करत असलेली कर्जमाफीची घोषणा प्रत्येक गावात पोचावी यासाठी आमदारांनी आणि पक्षकार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे, असे सांगितले गेले. गावागावात कर्जमाफीची माहिती पोचवण्यात येणार असल्याचे भाजपतर्फे सांगण्यात आले.