पारदर्शक कारभाराचे सरकारचे सोंग!

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

विरोधकांचे मुख्यमंत्र्यावर ताशेरे; महेता, देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी

विरोधकांचे मुख्यमंत्र्यावर ताशेरे; महेता, देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी
मुंबई - 'एसआरए' प्रकरणात गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता व एमआयडीसीची 31 हजार एकर जमीन "डीनोटिफाय' करण्याच्या प्रकरणात मोठा आर्थिक गैरकारभार झाल्याचा आरोप करीत या दोन्ही मंत्र्यांची न्यायालयीन चौकशी करा, चौकशी पूर्ण होईपर्यंत या मंत्र्याचे राजीनामे घ्या, अशी आक्रमक मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत शुक्रवारी केली. पारदर्शक कारभाराची गर्जना करणाऱ्या फडणवीस सरकारने या मंत्र्यांना पाठीशी घालत पारदर्शक सरकारचे सोंग घेतल्याची टीकाही या वेळी विरोधकांनी केली.

सरकारच्या या दोन्ही मंत्र्याच्या भ्रष्ट कारभाराबाबत विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेत बोलताना सरकारवर टीकेचे प्रहार केले.

प्रकाश महेता यांनी एका खासगी बांधकाम व्यावसायिकाला फायदा करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून निर्णय घेतल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी पाठराखण केली. त्यांना या प्रकरणाची माहिती होती अशी शंका घेण्यास वाव असल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला.
हे सरकार केवळ घोषणाबाजी करणारे असून, कर्जमाफीची घोषणा हवेत विरली असून एकाही शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नाही. आभासी जगात रमणारे सरकार असून, यामुळे नतेचा "फुटबॉल' झाल्याची टीका त्यांनी केली.

जयंत पाटील यांनीदेखील महेता व देसाई या मंत्र्यांच्या बेकायदा निर्णयाचे पुरावे देत मुख्यमंत्री कारवाई करत नाहीत याचा अर्थ त्यांची या निर्णयांना सहमती होती काय? असा प्रश्न निर्माण होत असल्याचे म्हटले. पारदर्शी कारभारावरचा जनतेचा भरोसा उडाला असून सरकार विरोधी नाराजीचा सूर आहे. या सरकारच्या विरोधात तीन वर्षांत बैलगाडी व ट्रक भरून पुरावे जमा होत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.