इंद्रधनुष्य योजनेअंतर्गत नऊ जिल्ह्यांत लसीकरण

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

मुंबई - राज्यातील नऊ जिल्हे व 13 महापालिका, नगरपालिका क्षेत्रामध्ये 7 ऑक्‍टोबरपासून मिशन इंद्रधनुष्य योजनेअंतर्गत लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. लसीकरणाने टाळता येणाऱ्या आजारामुळे बालमृत्यू होऊ नये, तसेच राज्याचा बालमृत्यू दर कमी करण्यासाठी ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी गुरुवारी येथे केले.

मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक झाली. या वेळी मुख्य सचिवांनी जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आढावा घेतला.

राज्यात नऊ जिल्हे व 13 महापालिका क्षेत्रात 7 ऑक्‍टोबरपासून पुढील चार महिन्यांपर्यंत मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत दोन वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या महापालिका - नगरपालिका क्षेत्रामध्ये गृहभेटी देऊन बालकांना करण्यात आलेल्या लसीकरणाबाबतचे सर्वेक्षण केले जात आहे. ते येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्य सचिवांनी या वेळी दिले.

नाशिक, नगर, नंदुरबार, बीड, नांदेड, सोलापूर, जळगाव, ठाणे, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तसेच मालेगाव, जळगाव, ठाणे, उल्हासनगर, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, नगर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मीरा भाइंदर, सोलापूर, नांदेड या 13 महापालिका क्षेत्रामध्ये ही मोहीम घेण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 पर्यंत 90 टक्के बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार सर्वांनी इंद्रधनुष मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मल्लिक यांनी केले.
बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, महिला व बाल विकास विभागाच्या सचिव विनिता वेद, आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनीषा वर्मा आदी उपस्थित होते.