नेतृत्वहीन मोर्चामुळे सावळागोंधळ - मेटे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 मे 2017

मुंबई - राज्यात नऊ ऑगस्टपासून लाखोंचे विक्रमी मराठा क्रांती मोर्चे निघाले. मात्र, हे मोर्चे नेतृत्वहीन असल्याने सगळा सावळागोंधळ आहे. सामान्य मराठा माणूस प्रश्‍न मार्गी लागत नसल्याने व्यथित झाल्याची खंत "शिवसंग्राम'चे नेते आमदार विनायक मेटे यांनी आज व्यक्‍त केली. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा क्रांती मोर्चा येत्या नऊ ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार असल्याबाबत मेटे यांना विचारले असता ते म्हणाले, की मराठा क्रांती मोर्चा दिशाहीन व नेतृत्वहीन झाला आहे. अनेक मराठा संघटनांमध्ये समन्वय राहीलेला नाही. ऐक्‍य नाही. मराठा समाजाच्या प्रश्‍नावर सर्व जण एकत्र यायला तयार नाहीत. मराठा समाज मात्र एकीने समोर येत असताना केवळ नेतृत्व नसल्याने या मोर्चाला गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे एवढे मोठे मोर्चे निघूनही समस्या मात्र कायम आहे. मराठा समाजाच्या प्रश्‍नावर अजून कोणताही ठोस तोडगा निघाला नाही.

सर्वच मराठा संघटनांनी एकत्र येऊन मोर्चाचे नेतृत्व करायला हवे. असे ऐक्‍य झाले तरच हाती काही तरी पडेल. अन्यथा कितीही मोर्चे निघाले आणि त्यामध्ये मतभेद कायम राहिले तर मात्र समाजाचा भ्रमनिरास होईल, अशी खंत मेटे यांनी व्यक्‍त केली.