तुरुंगाच्या क्षमतेपेक्षा जास्त महिला कैदी

तुरुंगाच्या क्षमतेपेक्षा जास्त महिला कैदी

मुंबई - तुरूंगातील क्षमतेपेक्षा महिला कैद्यांचे प्रमाण 400 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असल्याची खळबळजनक माहिती राज्य महिला आयोगाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) पाहणी अहवालातून समोर आली आहे. ठाणे, येरवडा, नाशिक रोड, कल्याण आणि भायखळा तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने कैद्यांच्या व्यवस्थापनात अडचणी येत असल्याने महिला कैद्यांसाठी नवीन खुले कारागृह सुरू करावे, अशी सूचनाही एसआयटीने केली आहे.

भायखळा कारागृहातील कैदी मंजुळा शेट्ये हिचा पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. आनंद निरगुडे, निवृत्त पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली देशपांडे यांची समिती स्थापन केली होती. या समितीने भायखळा कारागृहाबरोबर राज्यातील महिला कैद्यांच्या इतर कारागृहांची पाहणी करून महिला कैद्यांचे प्रश्‍न आणि त्याचे व्यवस्थापन कसे करता येईल याबाबत सूचना केल्या आहेत. हा अहवाल रहाटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी सादर केला.
या पाहणी अहवालात महत्त्वाच्या निरीक्षणांनुसार महिलांच्या तुरुंगातील क्षमतेपेक्षा महिला कैद्यांचे प्रमाण अनेक ठिकाणी जास्त आहे. राज्यातील विविध तुरुंगांमध्ये पुरुष कैद्यांच्या तुलनेत महिला कैद्यांचे प्रमाण कमी असून, महिला कैद्यांची एकूण संख्या एक हजार 165 आहे. येरवडा, कोल्हापूर, ठाणे, औरंगाबाद, नाशिक रोड, भायखळा, चंद्रपूर, कल्याण, चंद्रपूर, कल्याण, जळगाव, सोलापूर या जिल्हा कारागृहांतील महिला विभागात बंदी क्षमतेपेक्षा 100 ते 400 पटींनी अधिक असल्याची माहिती देण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा जास्त कैदी असणाऱ्या कैद्यांना जवळच्या कारागृहात हलविण्याची सूचना देखील अहवालात केली आहे. कोल्हापूरच्या कैद्यांना सावंतवाडी येथे किंवा नाशिकच्या कैद्यांना धुळे, नंदूरबार येथे हलवता येऊ शकते, असे मत समितीने व्यक्‍त केले आहे.

कारागृहातील महिला कैद्यांना त्यांच्या अडचणी किंवा तक्रार करण्यासाठी तक्रारपेटी ठेवली जावी, अशीही सूचनाही करण्यात आली आहे. महिला कैद्यांसाठी नवीन खुले कारागृह सुरू केले जावे, तसेच खुल्या कारागृहात महिला कैद्यांना जाता यावे यासाठी पात्र होण्याची अट पाच वर्षांवरून तीन वर्षे करावी, अशा प्रमुख शिफारशी या अहवालात केल्या आहे. महिला कैद्यांना प्राथमिक उपचार तत्काळ मिळावेत, यासाठी प्रत्येक कारागृहात दोन महिला परिचारकांची नेमणूक करण्याची आवश्‍यकताही समितीने व्यक्‍त केली आहे. जामीन मिळूनही जामिनाची पूर्तता न केल्याने 23 महिला राज्याच्या चार कारागृहांत आहेत. त्यापैकी 16 तर भायखळा कारागृहात आहेत.

"एसआयटी'च्या सूचना
- आयपी बेस्ट सीसी टीव्ही बसविण्यात यावेत
- टेली मेडिसीन सुविधा उपलब्ध करावी
- व्हिडिओ कॉलिंगची सोय करावी
- सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करावेत

राज्यातील एकूण स्थिती
तुरुंग.. क्षमता...प्रत्यक्षात कैदी

भायखळा..262...299
येरवडा ..126...239
कोल्हापूर...34...55
ठाणे....25...101
औरंगाबाद..31...89
नाशिक रोड...60....124
कल्याण...35....88

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com