पक्षविस्तार हेच उद्दिष्ट ठेवून काम करा - अमित शहा

पक्षविस्तार हेच उद्दिष्ट ठेवून काम करा - अमित शहा

मुंबई - स्पष्ट बहुमताला आवश्‍यक असणाऱ्या जागा कमी पडल्याने महाराष्ट्रात आजची स्थिती आली आहे, त्यामुळे भाजपला सर्वाधिक जागा निवडून देणारा पक्ष असून भागणार नाही हे लक्षात घेत पक्षविस्तार हे एकमेव उद्दिष्ट ठेवून काम करा, असा स्पष्ट आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी दिला.

राज्यात सत्ता येऊन अडीच वर्षे लोटली; पण महामंडळांवरचे नियुक्ती पत्र अद्याप आम्हाला दिसले नसल्याचा विषय कार्यकर्त्यांच्यावतीने मराठवाड्यातील एका नेत्याने उपस्थित केला होता, त्यावर अमित शहा यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत "पक्षकाम वाढवा, बाकी कसलीही अपेक्षा धरू नका,' असे आज सुनावले. कोणत्याही काळात कसोटीचे प्रसंग केव्हाही येऊ शकतात, त्यामुळे पक्ष कुठे कमी पडला याचा विचार करा, अन्य सर्व विषय आमच्यावर सोपवा, असेही त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितल्याचे समजते. मुदतपूर्व निवडणूक महाराष्ट्रात होणार नाही, असेही शहा यांनी सूचित केले; मात्र काही महिन्यांत होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत भाजप यापेक्षाही सरस कसा ठरेल याची रचना करण्याची जबाबदारी पक्षाचे आमदार आणि विविध कार्यकर्त्यांवर सोपविण्याचे नियोजन शहा करीत आहेत. संपूर्ण देशात आपण ही मोहीम राबवत असून, भाजपची कॉंग्रेस होऊ द्यायची नसेल, तर मेहनत आणि लोकसंपर्काला कोणताही पर्याय नसल्याचे अंजन त्यांनी घातले.

समाजातील शेवटचा घटक हा भाजपचा केंद्रबिंदू मानून त्यांच्या विकासाच्या योजना हे भाजपचे लक्ष्य असल्याने आता कार्यपद्धतीत बदल करा, असेही त्यांनी सुचवले. पक्षाचे पदाधिकारी आणि मंत्री खासदारांच्या बैठकीत अमित शहा यांना विविध प्रश्‍न विचारण्यात आले असे समजते. मंत्रिमंडळ विस्तारापासून तर महामंडळ नियुक्‍त्यांपर्यंत कार्यकर्ते विविध विषयांवर आग्रही होते. मात्र, महाराष्ट्रात जागा कमी का पडल्या याचा तेवढा विचार करा, असे शहा यांनी म्हटल्यानंतर सर्व प्रश्‍न थांबले. गावागावांत पक्ष पोचवावा हे सांगतानाच, ज्या लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार नाही, ज्या विधानसभा क्षेत्रात यश मिळाले नाही, तेथे येत्या दीड वर्षात विविध योजना राबविण्यावर जोर देण्यात येणार आहे. शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही. त्यांचा योग्य तो आदर कसा राखयचा ते आम्ही बघू, असेही शहा यांनी महाराष्ट्रातील प्रमुख मंडळींना सांगितल्याचे समजते.

फडणवीस सरकारमधील मंत्र्यांशीही आज संवाद साधून अमित शहा यांनी कार्यक्षमता वाढविण्याचा सल्ला दिला असल्याचे समजते. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अमित शहा परळ परिसरातील संघ कार्यालयात सकाळी जाणार असून, दुपारी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. भाजपच्या आघाड्या आणि मोर्चे सक्षम करण्याचे नियोजन हा उद्याचा विषय असल्याचे समजते. रविवारी (ता. 18) दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी ते "मातोश्री'वर जातील.

"मुदतपूर्व' मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युवा आहेत, ते राज्यासाठी अनेक चांगली कामे करीत आहेत; पण मुदतपूर्व निवडणुकांना सामोरे जायचे का, हा प्रश्‍न त्यांच्या अखत्यारितला नसून तो पक्षाचा निर्णय असेल, असेही शहा यांनी प्रमुख नेत्यांच्या बैठकीत सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com