अल्पवयीन मुलीच्या गर्भपातास नकार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

मुंबई - बलात्कारातून 27 आठवड्यांची गर्भवती असलेल्या अल्पवयीन मुलीच्या गर्भपातास शुक्रवारी (ता. 13) उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली. या वेळी न्यायालयाने राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेतील त्रुटींबाबत उच्च न्यायालयाने नाराजीही व्यक्त केली आहे. 

बलात्कारामुळे गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीने न्यायालयाकडे गर्भपात करण्याची परवानगी याचिकेद्वारे मागितली होती. या याचिकेवर न्या. रणजीत मोरे आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. या मुलीची वैद्यकीय तपासणी तातडीने करण्याचे निर्देश न्यायालयाने केईएम रुग्णालयाला दिले होते. या तपासणीचा अहवाल खंडपीठापुढे दाखल करण्यात आला. मुलीच्या गर्भात कोणताही दोष नाही आणि ती 27 आठवड्यांची गर्भवती आहे. कायद्यानुसार आम्ही अशा परिस्थितीत मुलीला गर्भपाताची परवानगी देऊ शकत नाही, असे सांगून न्यायालयाने हळहळ व्यक्त केली. ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुलीची प्रकृती खालावत असल्यामुळे तिच्या पालकांनी गर्भपातासाठी याचिका दाखल केली होती. मुलगी अशक्त असून बलात्कारातून झालेल्या गर्भधारणेमुळे मानसिक आणि शारीरिक तणावात आहे. त्यामुळे तिच्या प्रकृतीला धोका निर्माण होऊ शकतो, असे वडिलांचे म्हणणे होते.